राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीतून पुन्हा अजित पवार यांना निशाणा केला आहे. अजित पवार यांना काय कमी केले, नेहमी सर्व सत्तापदे त्यांना दिली. सुप्रियाला फक्त खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही, असे शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटले आहे. अजित पवार यांच्या आरोपांना शरद पवार यांनी दिलेले हे जोरदार उत्तर आहे.
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? होय, मला संधी मिळाली असती. मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. मी कधीही पुतण्या आणि मुलगी यांच्यात भेद केला नाही. यामुळे सुप्रिया सुळे हिला फक्त खासदारकी दिली. आता ती लोकसभेत पक्षाची गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. परंतु तिला कधीही सत्तापद दिले नाही. दुसरीकडे अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली.
अजित पवार यांना राज्यात मंत्री केले. अनेक कॅबिनेट मंत्रीपदे देताना सर्व महत्त्वाची खाती दिली. एक, दोन नव्हे तर तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद दिले. विधिमंडळातील गटनेतेपद अजित पवार याला केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. हे सर्व दिल्यानंतर अजून काय हवे होते? असा प्रश्न शरद पवार यांनी अजित पवार यांना विचारला.
सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता होत नाही, या अजित पवारचा दावा शरद पवार यांनी खोडून काढला. त्यासाठी स्वत:चे उदाहरण त्यांनी दिले. आपल्या ५६ वर्षांच्या राजकीय जीवनात केवळ २० वर्षे आपण सत्तेत होतो. इतर सर्व काळ विरोधी पक्षात घालवला. देशात आणि राज्यात अनेक दिग्गज नेत्यांनी विरोधी पक्षात राहुन आपले स्थान निर्माण केले, असे शरद पवार यांनी म्हटले.
हे ही वाचा…
राष्ट्रवादीकडे त्या वेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवार यांची धक्कादायक कबुली