विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारच 2019च्या राजकीय खेळी मागे असल्याचंही फडणवीस यांच्या दाव्यातून स्पष्ट झालं आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.
शरद पवार यांनी 2019मध्ये आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्याआधी 2017 लाही त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. कोणत्या एजन्सीला घाबरून त्यांनी चर्चा केली होती? तेव्हा पवारसाहेब कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या मान्यतेनेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं आहे. पवार साहेबांशी चर्चा करून आम्ही सह्या करूनच आलो आहोत हेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आता सगळं गेल्यानंतर आरोप करणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.
अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. राजकारणात कुठे ना कुठे संधी मिळतेच. अजितदादा हे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, आम्ही सर्व निवडणूका एकत्रित लढणार आहोत. काल मी अतिशय क्लिअर बोललो आहे. काही लोकाना माझं वाक्य समजलं नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी दिल्लीला जाणार नाही. दिल्लीत नक्षलवादाबाबतची बैठक आहे. या बैठकीला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. त्यासाठी ते गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.