मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं सांगतानाच येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. (Sharad Pawar doing well after surgery: Rajesh Tope)
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवारांवर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
दैनंदिन कार्यावर परिणाम नाही
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. येत्या 8-10 दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
नियम पाळा, लॉकडाऊन टाळा
राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र त्याबाबतची चर्चा झाली आहे. लॉकडाऊन करायचा नसेल तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. नियम पाळा, लॉकडाऊन टाळा हाच एक पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले जाऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात कुठेही बेड्सची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राणे, मुश्रीफांकडून विचारपूस
पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आज सकाळी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते. तसेच राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पवारांनी या नेत्यांशी दहा मिनिटे चर्चा केली. तर, दोन दिवसांपूर्वी पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश बड्या राजकारण्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. (Sharad Pawar doing well after surgery: Rajesh Tope)
Sharad Pawar Update | शरद पवार यांची तब्येत चांगली, सुप्रिया सुळेंचं ट्विटhttps://t.co/Wsdz0PS8k3#Sharadpawar #SupriyaSule
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
संबंधित बातम्या:
शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो, म्हणाल्या…
मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना, शरद पवारांचे थेट रुग्णालयातून ट्वीट
Sharad Pawar | शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे सहकुटुंब ब्रीच कँडीत
(Sharad Pawar doing well after surgery: Rajesh Tope)