दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी फूट पडलीय. पक्ष दोन गटात विभागला गेलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. विशेष म्हणजे नागालँडमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. असं असताना शरद पवार यांच्या गटाला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. या निवणुकीत अध्यक्षपदासाठी शरद पवार यांनी बिनविरोध निवड झालीय. पण त्यांचं पूर्ण पॅनल पराभूत झालं आहे. दक्षिण मुंबईत सर्वात मोठा क्लब आणि कोट्यवधींचा वार्षिक उलाढाल असलेल्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार हे अध्यक्षपदासाठी बिनविरोध विजयी झाले असले तरी त्यांचं संपूर्ण पॅनल पराभूत झालंय. पवार डेव्हलपमेंट ग्रुप विरुद्ध GCH डायनॅमिक ग्रुप या दोन पॅनलमध्ये लढत होती. जवळपास 13 हजार सामाजिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. तीन दिवस ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी नुकतीच काही वेळापूर्वी पार पडली. या निवडणुकीत शरद पवार विजयी झाले. पण त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झालाय.
शरद पवार गटाची जवळपास 30 वर्षांपासून गरवारे क्लबमध्ये एकहाती वर्चस्व होते. पण त्याचं हे वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे. शरद पवार यांनी 12 कोटींवरून क्लबची 200 कोटीवर ठेवी नेल्या आहेत. पण या वर्षीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.
शरद पवार यांच्या पॅनलमधून उपाध्यक्ष पदासाठी उभे असलेले भाजपचे माजी आमदार राज पुरोहित यांचाही पराभव झालाय. GCH डायनॅमिक ग्रुपच्या रणनीती आखली गेली, त्याच्या पडद्यामागे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा होते.
या विजयानंतर गरवारे क्लब येथे सेलिब्रेशन सुरु झालंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गरवारे कल्ब येथे पोहोचले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलच्या पराभवासाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याची माहिती मिळत आहे, अशी चर्चा आहे.