मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक छापून तयार झालं आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा करतानाच भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचं उच्चाटन करायचं होतं असा दावा या पुस्तकातून शरद पवार यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये 2019मध्ये अंतर का वाढलं? याची माहिती देतानाच महाविकास आघाडीच्या जन्माची कहानीही पवार यांनी पुस्तकात विशद केली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचं आव्हान होतं. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते, असं शरद पवार यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचं प्रतित होत होतं. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणे कायम होत्या. भाजप आणि शिवसेना यांच्या संवादाची गरज असे तेव्हा शीर्षस्थ नेतृत्व मातोश्रीवर येऊन संवाद घडवत असे. पण बदलेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची भाजपच्या नेत्यांकडून मातोश्रीवर येऊन संवाद घडवावा हीच अपेक्षा कायम होती.
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचं उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करण्यात येणार नाही असा सरळ राजकीय हिशोब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती, असं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथन असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन 2 मे रोजी होणार आहे. शरद पवार यांच्याच उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटर येथे सकाळी 11 वाजता या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य असण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळावर भाष्य केलं असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय महाविकास आघाडीची जन्मकथाही या पुस्तकात सविस्तर मांडण्यात आली असावी, असं सांगितलं जात आहे.