मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. असं असताना आज अचानक शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास 30 ते 35 मिनिटे चर्चा झाली. विशेष म्हणजे भेटीनंतर शरद पवार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण सुरुवातीला गुलदस्त्यात होतं. नंतर शरद पवार यांनी आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली. यानंतर शरद पवार एका कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची बातमी समोर आली. पण तरीही या भेटीनंतर शरद पवार जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाहून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मौन का पाळलं? ते वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी काही न बोलता का निघून गेले? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
विशेष म्हणजे या भेटीत काय घडलं? याबाबतचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट चॅनलशी फोनवर संवाद साधत दिलं. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतंय? याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. अर्थात राजकीय पटलावर पडद्यामागे काही घडामोडी घडत असतील तर त्याचा उलगडा आगामी काळात होईलच. कारण आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. “शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. या संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार आले होते”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“ही सदिच्छा भेट होती. या बैठकीत काही चर्चा झाली नाही. या भेटीत निमंत्रण होतं. याशिवाय काही एक-दोन छोटे विषय होते. यामध्ये शाळांचा विषय होता, कलावंतांचा विषय होता. मुख्य म्हणजे त्यांचं निमंत्रण होतं. अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. बाकी काही नाही”, असं शरद पवार ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले.