मुंबई | 11 ऑक्टोबर २०२३ | मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील का कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शरद पवार यांनी महिला आघाडीला संबोधित करत असताना सरकारवर देखील टीका केली. यावेळी शरद पवार म्हणाले की, तुम्हा सर्वांचे विचार ऐकण्यासाठी मी मुद्दाम येथे बसलो. सर्वांनी संघटनात्मक भूमिका मांडली. आता काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. महिला उत्तम संघटनात्मक काम करतात, हे सर्वांनी दाखवून दिलं. महिलांना लष्करात काम करायला मिळावं, हा निर्णय मी संरक्षण मंत्री असताना घेतला. मात्र देशात आज महिलांची धिंड काढली जात आहे.
महिलांवर अन्याय झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला बहिणी यांनी रस्त्यावरच उतरलं पाहिजे. आज नोकऱ्यांची कमतरता आहे, दुसरीकडे रिक्त जागांची संख्या जास्त आहे. प्राथमिक शिक्षणापासून मुलांना लांब ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कंत्राटी नोकऱ्यांवर भर देण्यात येत आहे, यात आरक्षण कुठेच नाही. कंत्राटी भरत्यांमध्ये कुणालाच नाही, महिलांनाही आरक्षण नसतं. म्हणून कंत्राटी भरतीमध्ये महिलांना संधीच मिळणार नाही, असं दिसतंय. राज्यातील १९ हजार महिला बेपत्ता आहेत. व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारलं जातं.
सरकार खासगी कंपन्यांना जिल्हा परिषद शाळा चालवायला देणार आहेत. सीएसआर फंडातून या शाळा चालवण्यास परवानगी देणार आहेत. यातून विकास करावा. ज्या कंपनीने शाळा दत्तक घेतली, त्या शाळेला कोणतंही नाव घेण्याचा नाव देण्याचा अधिकार आहे. शाळेच्या कारभारात दखल देण्याचा, शाळेची संपत्ती खासगी कार्यक्रमासाठी देण्याचा अधिकार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एका मद्य बनवणाऱ्या कंपनीने एक शाळा दत्तक घेतली. तेथे त्यांनी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की, १ जाने २०२३ ते ३१ मे २०२३ किती तरुणी, महिला, मुली बेपत्ता झाल्या? सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आलं. १९ हजार ५५४ फक्त ५ महिन्यात बेपत्ता झाल्या. एवढ्या महिला बेपत्ता होत असतील तर गप्प बसायचं का. असा प्रश्न शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.