विधानसभा निवडणुकीबाबत आमच्यातही मतभेद; शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 28, 2023 | 2:57 PM

शरद पवार यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा आरक्षणाकरिता राज्यात सध्या वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने सुरू आहेत. परिस्थितीचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यावी. अतिरेकीपणा करू नये. ज्यांची मागणी आहे ते आणि सरकारने बसून चर्चा करावी यातून मार्ग काढावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीबाबत आमच्यातही मतभेद; शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : इंडिया आघाडीतील काही मुद्द्यांवरील मतभेदावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उघड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र राहावं यावर आमचं एकमत आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्यावरून आमच्यात काही ठिकाणी मतभेद आहेत, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. तसेच हे मतभेद दूर करण्यासाठी चर्चा करून मार्ग काढणार असल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली आहे. तसेच अनेक राज्यात लोक परिवर्तन घडवून आणण्याच्या विचारात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्यावरून आमच्यात मतभेद आहेत, असं सांगतानाच शरद पवार यांनी पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष प्रबळ आहे. त्यामुळे त्यांना स्वबळावर लढायचं आहे. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पण त्यावर चर्चा करून आम्ही मार्ग काढू असं शरद पवार म्हणाले.

सध्या देशात अस्वस्थता

सध्या देशात अस्वस्थता आहे. अनेक राज्यात लोक बदलाच्या विचारात आहेत. लोकांना बदल हवा आहे. देशाचं चित्र पाहिलं तर मोदी किंवा त्यांच्या विचाराचा पक्ष काही ठिकाणीच सत्तेत आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बदल दिसतोय. पण लोकसभेबाबतची माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

उद्याच दिल्लीला जाणार

मी उद्याच दिल्लीला जाणार आहे. परवा इंडिया आघाडीतील आम्ही काही लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा करणार आहोत. इंडिया म्हणून एकत्र येऊन पर्याय द्या असं लोक सांगत आहे. त्यामुळे आम्हाला आणखी काम करावे लागणार आहे. त्याची चर्चा या बैठकीत होईल, असं शरद पवार म्हणाले.

वंचितसह पुढे जावं

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आणि इंडिया आघाडीत घेणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यावर चर्चा झाली नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे. वंचितसह पुढे जावं, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं.