दिनेश दुखंडे, अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर टीका का करतात मला माहीत नाही. मी जिथे जिथे जातो, तिथे मला लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय. त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे गेला असेल. पण पंतप्रधान हे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते, शरद पवार यांच्या दर्शनाची गरज काय होती?, असा खोचक टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पंतप्रधांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मला कशासाठी टार्गेट केलं ते माहीत नाही. देशात काय घडतंय हे पंतप्रधानांना समजलं पाहिजे. त्यांनी जे विधान केलं त्याचं वास्तव ब्रिफिंग त्यांना करण्यात आलेलं दिसत नाही. ब्रिफिंग नसताना असं चित्रण करण्यासाठी एक धाडस लागतं. ते त्यांनी दाखवलं. पण त्यांनी केलेलं विधान सत्यावर वा वास्तवावर आधारीत नव्हतं, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्री म्हणून विविध कार्यक्रमात कसा गौरव केला. ते काय म्हणाले होते? ती विधानचे शरद पवार यांनी यावेळी वाचून दाखवली. एका संस्थेच्या भूमीपूजनावेळी मोदी यांनी माझा गौरवाने उल्लेख केला. शेतीच्या क्षेत्रात काही करण्यासारखं काही आहे का. मला शिकायचं होतं. सार्वजनिक जीवनात मला मदत केल्याबद्दल शरद पवार यांचं अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले होते.
त्यानंतर दिल्लीतील विज्ञान भवनात 2015 रोजी मोदींनी माझा गौरव केला. त्यावेळी मीही उपस्थित होतो. प्रणव मुखर्जी आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. तेव्हा शरदराव कृषी मंत्री असताना त्यांचा मला फोन आला. मी पुण्याला जात आहे. अहमदाबादला येत आहे, असं शरद पवार म्हणाले. मी म्हटलं या. मला आठवतंय. ते गुजरातची सर्व माहिती घेऊन आले होते. शेतीबाबत त्यांनी चर्चा केली. गुजरातच्या शेतकऱ्यांनी गव्हाकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला होता, असं मोदींनी म्हटलं होतं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
परवा त्यांनी जे भाषण केलं आणि वस्तुस्थिती काय होती हे तुमच्या लक्षात आणून दिलं. पंतप्रधान एक संस्था असते त्यामुळे मी टीका करत नाही. मी फक्त माहिती दिली. तुम्ही रस्त्यात कांदा सडतोय वगैरे दाखवलं. त्यावरून शेतीकडे केंद्र आणि राज्याचा दृष्टिकोण काय आहे दिसून येतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
ब्राझिलनंतर भारतात सर्वाधिक साखर तयार होते, असं असताना पंतप्रधान मोदींनी कालच्या भाषणात इथेनॉलचा उल्लेख केला. पण त्यांनी साखरेच्या निर्यातीवर भाष्य केलं नाही. साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. किंमतही चांगली आहे. पण मोदी सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, असं ते म्हणाले.