मुंबई: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक (Farmers protest) टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट कशी बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar get aggressive over Farmers issue again will go to Delhi)
शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात भाष्य केले. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात मी इतर पक्षांसोबत बोलणार आहे. यापूर्वी आम्ही पाच ते सहा राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आम्ही केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात सांगितलेच आहे, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या 12 दिवसांपासून चिल्ला सीमेवर सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. काही शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत दिल्ली-नोएडा सीमा खुली केली.
तर दुसरीकडे उर्वरित शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार बधत नसल्याचे पाहून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी प्रमुख शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते सोमवारी उपोषण करणार आहे. तर रविवारी दिल्ली-जयपूर महामार्गावर हजारो शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे.
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शेतकरी आंदोलनाच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. शेतकऱ्यांच्या वेषात लपून काँग्रेस आणि डाव्यांकडून हे आंदोलन केले जात आहे. कृषी कायद्यांविरोधात संभ्रम पसरवला जात आहे, असा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.
संबंधित बातम्या:
Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार
(Sharad Pawar get aggressive over Farmers issue again will go to Delhi)