मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा पेच अजूनही सुटलेला नाही. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. दुसरीकडे राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध केला आहे. राज्यात आरक्षणावर या सर्व गोष्टी घडत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणावर नवा फॉर्म्युला सूचवला आहे. राज्य सरकार का फॉर्म्युला स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर 16 टक्के आरक्षण अधिक वाढवलं तर 50 टक्के अधिक 16 टक्के होऊन 66 टक्के होईल आणि त्यात सर्व प्रश्न सुटतील, असा फॉर्म्युला शरद पवार यांनी सूचवला आहे. 50 टक्क्यांवर आरक्षण जाऊ नये ही गोष्ट खरी आहे. कोर्टाचा तसा निकाल आहे. पण तामिळनाडू सरकारने हे बंधंन 74 टक्के करून घेतलं आणि हे कोर्टात टिकलं, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधलं.
काही निर्णय केंद्राने आता घेतले. कोर्टाने त्यांच्या विरुद्ध निकाल दिला आणि त्याच्या नंतर त्यांनी कायदा बदलला. केंद्र सरकार हे करू शकतात तर 14 ते 16 टक्के आरक्षण वाढवून निकाल देऊन का टाकत नाही? असा सवाल शरद पवार यांनी केला. जो गरीब माणूस आहे त्याच्या ताटातली भाकरी काढून का घेता? याचं काढून घ्या, त्याला काढून द्या याला काही अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
यावेळी शरद पवार यांनी निवडणूक चिन्हावरूनही थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोग आणि त्यासंबंधी वृत्तपत्रामध्ये अनेकांचे येणारे स्टेटमेंट याची चर्चा होत आहे. 1967 साली मी काँग्रेसकडून निवडणूक लढलो. माझ्या आयुष्यात सहा निवडणुकीला वेगवेगळी चिन्ह घेऊन मी लढलो. सातत्याने एक ओळ सांगितली जाते, ती म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हाला मिळेल.
त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल होते. मात्र काळजी करु नका. आपण लोकांमध्ये राहिलो तर चिन्ह आणि नाव महत्वाचं नसतं. त्याच्यावर आपण मात करू शकतो, असं सांगतानाच इलेक्शन कमिशनवर टीका टिप्पणी करू नका, ते काही निर्णय देतील तो अंतिम आहे, असंही त्यांनी सांगितलं.