मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात एसआरएच्या सोसायटीत गाळे बळकावल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती स्वत: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर शिंदे गटही या घटनेनंतर सक्रिय झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करून किशोरी पेडणेकर यांच्यावर खोचक टीका केली आहे.
शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी पोस्ट केली आहे. त्यावर कचोरी ताई… आता काय करणार? असा खोचक सवाल शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर आता यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
किशोरी पेडणेकर आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध वरळीतील गोमाता जनता एसआरएमधील गाळे बळकावल्याप्रकरणी वांद्र्याच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टीवासियांची घरे ढापली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीत किशोरी पेडणेकर यांनी गाळे बळकावल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.
कचोरी ताई… आता काय करणार ??? https://t.co/o694D5O3lG
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) January 14, 2023
त्यानंतर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केली होती. तर मुंबईतील एका न्यायालयाने पेडणेकर यांना समन्सही जारी केलं होतं. त्यानंतर अखेर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेडणेकर यांनी एसआरएमधील 6 गाळे हडप केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी आपण दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती, असा दावाही त्यांनी केला होता.सोमय्या यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी भूमिका स्पष्ट केली होती.
पेडणेकर यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळले होते. दरम्यान, याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे किशोरी पेडणेकर या प्रकरणावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.