मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कमी झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या आमदारांची सुनावणी सुरू आहे. या आमदारांनी सहा हजार पानाचं उत्तरही विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यात भक्कम पुरावेही दिले आहेत. या पुराव्यांची छाननी सुरू झाली आहे. तसेच उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यासही सुरुवात झाली आहे. विधिमंडळाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या कार्यवाहीकडे लागल्या आहेत.
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील कारवाईला वेग आला आहे. शिवसेनेच्या उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यास विधिमंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांकडून विधानसभा अध्यक्षांकडे 6 हजार पानी उत्तर दाखल करण्यात आलं आहे. शिवसेना आमदारांच्या उत्तरात कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्हीच शिवसेना हे पटवून देण्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा प्रयत्न आहे.स्पष्टीकरण देताना शिंदे गटाकडून पुरावे सादर करण्यात आले आहेत. ऊर्वरीत पुरावे प्रत्यक्ष सुनावणीवेळी सादर करणार असल्याचं लेखी उत्तरात आमदारांनी म्हटलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कारवाई सुरू केली आहे. जेव्हा विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशिअल ऑथरिटी म्हणून काम करत असतात. याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई करू, असं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. मात्र, कधी पर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेल याची माहिती त्यांनी दिली नाही.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल नार्वेकर उत्तम वकील आहेत. त्यांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे. त्यांना कायदा कळतो. ते योग्य निर्णय देतील. नियमानुसार निर्णय देतील. राहुल नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत. त्यांना कायद्याच ज्ञान आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.