मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला सरकारची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसांनी झाला होता. त्यानंतर अनेक दिवस खातेवाटपही झाले नव्हते. खातेवाटप झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. कारण मंत्रिमंडळात २८ जागा रिक्त आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेमुळे विस्तार रखडला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यात शिंदे सरकारला दिलासा मिळाला. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली होती. आता विस्ताराचा निर्णय झाला आहे.
कधी होणार विस्तार
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा गुरुवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या २३ किंवा २४ मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती टीव्ही ९ मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिंदे गटाची यादी तयार
शिंदे गटाची मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही तयार झाली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले होते बच्चू कडू
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. या विस्तारात माझी वर्णी कधी लागणार की नाही, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द होता. ते आपला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. २१ ते २६ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.राज्यात काम व्हायचं असेल आणि जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले होते.