मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिले. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. गेल्यावर्षी ही फुट पडल्यानंतर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मेदानावर झाला होता. तर, यंदा हा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. परंतु, शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. त्यामुळे या दोन्ही मेळाव्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याला काही क्षणांचा अवधी उरला आहे. मात्र, त्यापूर्वीच शिंदे गटाने व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री आझाद मैदानात रामलीला समितीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे यांचा शिवतीर्थावर होणारा मेळावा हा शिमगा मेळावा असल्याची टीका केली. मोदी आणि आमच्यावर टीका करणारा हा मेळावा असेल, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
गाढव गेलं आणि ब्रम्हचारही गेलेलं आहे. रामलीला, अयोध्या आणि राम मंदीर आमच्यासाठी श्रध्देचा विषय आहे. न भूतो न भविष्यती असा रेकोर्ड मोडणारा आपला दसरा मेळावा होईल, असा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला ठकारे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उत्तर देताना गद्दारांना गाडण्यासाठी ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. करोडो रूपयांचा चुराडा करून आजचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न गद्दार करत आहेत. विचारांपेक्षा अविचारांची पेरणी जास्त होणार आहे अशी टीका राऊत यांनी केली.
शिंदे गटाने ट्विटरवर जारी केलेल्या या व्यंगचित्रामध्ये उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना रावणासारखी दहा तोंडे असल्याचे दाखवण्यात आले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी जनमताचा कौल नाकारला. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांना विरोध केला त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर येणारे आझाद शिवसैनिक या गद्दारीला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा संदेश या व्यंगचित्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे.