मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. या प्रकरणी एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांचं वेळापत्रक आजच्या सुनावणीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना विचारले. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडलेल्या युक्तिवादावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय.
ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. “आम्ही वारंवार तुमच्याकडे मागणी करतोय. महत्त्वाचा मुद्दा हा अपात्रतेचा आहे. त्यासाठी इतर याचिका विचारात घेण्याची गरज नाही. महत्त्वाची याचिका निकाली काढा”, अशी भूमिका ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
“सर्व याचिका एकत्र करा. आमची मागणीवर विचार का केला जात नाही?”, असं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. “सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्रित नको”, असा आक्षेप शिंदे गटाचे वकील अनील साखरे यांनी नोंदवला आहे. पण सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली तर या प्रकरणावर लवकर निकाल घेता येईल. सर्व याचिकांचा मुद्दा हा अपात्रतेचाच आहे. त्यामुळे सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केलाय. पण याच युक्तिवावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय.
दरम्यान, शिंदे गटाच्या वकिलांकडून आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला. “आम्हाला शेड्यूल 10 लागू होत नाही. कारण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आमच्याविरोधात शेड्यूल 10 नुसार कारवाई होऊ शकत नाही”, अशी भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी मांडली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे.