मुंबई : वरळी हा शिवसेनेचे युवा नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटातील नेत्यांवर नेहमी हल्लाबोल करतात. मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान देतात. आता उद्या शिंदे गट वरळी येथे सभा घेणार आहेत. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरळीत (Worli Constituency) सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने वरळीत शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर नागरी सत्काराचं आयोजन उद्या वरळीत करण्यात आलं. वरळी भोईवाडा समिती आणि सर्वोदय नखवा समिती यांच्या माध्यमातून या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी शिंदे गटाचे नेते किरण पावसकर पूर्ण तयारी करत आहेत. जाहीर आणि भव्य अशी सभा व्हावी, यासाठी जय्यत तयारी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर होत आहे.
साधारणतः दहा ते बारा हजार लोकं या नागरी सभेला जमतील, अशाप्रकारचा अंदाज आयोजकांतर्फे व्यक्त केला जात आहे. ज्या मंचावरून ही सभा होणार आहे तो मंचदेखील तयार करण्यात येत आहे. या भव्य मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार होणार आहे. यावेळी ते आदित्य ठाकरे यांचा समाचार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात उभं राहून दाखवावं. या आव्हानाचं स्वीकार करत या सभेचे आयोजन केल्याची माहिती आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून आदित्य ठाकरे हे गद्दार असं म्हणत शिंदे गटावर टीका करत आहेत. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं ते उद्या काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते वरळीतील या कार्यक्रमात असणार आहेत. त्यामुळं चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगणार आहे. यावेळी ते आदित्य ठाकरे यांचा कसा समाचार घेतात, हे पाहावं लागेल.