Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शिंदेंच्या 4 खासदारांचं तिकीट धोक्यात?

| Updated on: Mar 07, 2024 | 9:49 PM

महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शाहांसोबत बैठका झाल्यानंतर, दिल्लीत भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली, ज्यातून समोर आलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेच्या 4 खासदारांचं तिकीट धोक्यात आल्याची माहिती आहे. या 4 मतदारसंघात भाजप आपला उमेदवार उतरवू शकते.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शिंदेंच्या 4 खासदारांचं तिकीट धोक्यात?
Follow us on

मोहन देशमुख, इनपूट एडिटर, मुंबई | 7 मार्च 2024 : महायुतीच्या जागा वाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की, वास्तविकतेच्या आधारावर जागा वाटप करणार. म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची ताकद पाहूनच विजयी होऊ शकतात का? हे पाहूनच किती जागा द्यायच्या हे भाजप स्पष्ट करेल. विशेष म्हणजे हे वक्तव्य फडणवीसांनी दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाशी झालेल्या बैठकीनंतर केलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतल्या जेपी नड्डा आणि अमित शाहांच्या बैठकीत चर्चा झालेला फॉर्म्युला म्हणजे भाजप 35-37 जागांवर लढू शकते. शिंदेंच्या शिवसेनेला 8 ते 9 जागा मिळू शकतात. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3-4 जागांची शक्यता आहे. शिंदे आणि अजित पवारांकडून बैठकांमध्ये भाजपवर दबाव टाकला जातोय. पण कितीही दबाव टाकला तरी सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट 9 आणि अजित दादांना 4च्या वर जागा मिळणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस म्हणालेत, त्याप्रमाणं ज्या जागांवर अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या 4 जागा आहेत. हिंगोलीत हेमंत पाटील शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मोठा मुद्दा असल्यानं भाजप ही जागा घेऊ पाहतेय. दुसरी जागा ही उत्तर पश्चिम मुंबईची आहे. इथं गजानन किर्तीकर खासदार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांचेच पुत्र अमोल किर्तीकरांना तिकीट मिळणार आहे. त्यातही गजानन किर्तीकरांच्या वयाचा विचार करता ही जागा भाजप मागतेय.

तिसरी जागा वाशिम-यवतमाळची आहे. इथं भावना गवळींच्या विरोधात सर्व्हे आल्याची माहिती असल्यानं तसंच गवळींच्या विरोधातल्या लाटेमुळं एक तर संजय राठोडांनी शिंदे गटाकडून लढावं किंवा मग भाजप इथं आपला उमेदवार देऊ शकते. चौथी जागा आहे नाशिकची. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. भाजप या जागेवर चाचपणी करतेय.

शिवसेनेची मागणी काय?

महायुतीत भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत. मात्र 2019 मध्ये युतीत ज्या 23 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या तेवढ्याच जागा शिवसेनेला द्या, अशी शिंदे गटाची मागणी आहे. मात्र तेवढ्या जागांची अजिबात शक्यता नाही आणि विद्यमान 13 जागा तरी मिळेल की नाही याचीही खात्री नाही. त्यावरुनच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी भाजपवर हल्लाबोल करतानाच, भाजपनं केसानं गळा कापू नये असा इशारा दिला. मात्र त्यानंतर फडणवीसांनीही कदमांना खडेबोल सुनावले.

अजित पवार गटाची मागणी काय?

ज्या पद्धतीनं रामदास कदम आणि फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमक झाली तशीच जागा वाटपावरुन चकमक भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये झालीय. मुनगंटीवारांच्या मताप्रमाणं आम्ही जागा घेणार नाही, असं भुजबळ म्हणालेत. त्यानंतर फडणवीसांही पुन्हा भुजबळांना वास्तविकतेची आठवण करुन दिली.

अजित पवारांनीही घड्याळ चिन्हावर जास्तीत जास्त जागा लढवणार असं म्हटलंय. विद्यमान खासदारांच्या आकड्यावर न जाता जिंकू शकतील अशाच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडाव्यात अशी भाजपची स्ट्रॅटर्जी आहे. तरी आणखी एक बैठक दिल्लीत 2-3 दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब होईल.