मुंबई : गेल्या अडीच वर्षात एखाद्या विकासकामाच्या श्रेयवादावरून भाजप (BJP vs Shivsena) आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमनेसामने यायची ही पहिलीच वेळ नाही. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. मागे भाजप सरकारमध्ये सुरू झालेली काही विकासकामं ही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये पूर्ण झाली. अशा कामांच्या लोकार्पणावरूनही अनेकदा वाद रंगला आहे. आज मुंबईतल्या बोरिवलीतही (Borivali Bridge) असाच प्रकार घडला आहे. एका पुलाच्या लोकार्पणाच्या वादावरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनसामने आल्याचे दिसून आले. कोरा केंद्रात एका पुलाचे उद्घाटने हे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पुलाच्या उद्घाटनापूर्वी पुलाखाली भाजपकडून ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते पुलावर ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करताना दिसून आले.
हा पूल आम्ही बांधला असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काही काळ हा वाद चांगलाच रंगला होता. यावेळी पोलिसांचा या परिसरात तगडा बंदोबस्त दिसून आला. त्यामुळे या आंदोलकांना आवर घालणे शक्य झाले.
सगळीकडे आदित्य ठाकरे यांचे फोटो लावले आहेत. आम्ही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो लावा असे सांगितले होते. मात्र तीही संधी त्यांनी घालवली आहे. तर कोणताही वाद नसून या ब्रिजचे उद्घाटन आम्ही सर्व मिळून करत आहोत, दोन पक्ष आहेत तर श्रेयवाद तर होणारच, तसेच बोरिवलीच्या नागरिकांच्या पैशातून हा ब्रिज झाला आहे. त्यामुळे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणं जास्त योग्य आहे. तसेच याठिकाणी गोंधळ होत नाही, लोक आनंदोत्सव साजरे करत आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी दिली आहे.
प्रोटोकॉलप्रमाणे महापालिकेने या ठिकाणचे स्थानिक आमदार, स्थानिक खासदारांना पालिकेने बोलवलं आहे. मात्र भाजपच्या या नोटंकीचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. दोन्ही बाजुचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने या परिसरात काही काळ तरी तणाव पाहायला मिळाला. यावेळी कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलिसांना दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना आवरणे कठीण होऊन बसले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनाही लोकार्पण करण्यासाठी गर्दीतून वाट काढत जावं लागलं.