मुंबई – मुंबईत गणरायाच्या दर्शनाला आलेल्या अमित शाहा (Amit Shah)यांनी मुंबई महापालिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा भगवा फडकवा, असे आदेश भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेनेने भाजपाची फसवणूक केलेली आहे, आणि ही फसवणूक सहन करु नका, असा सल्लाही अमित शाहा यांनी भाजपा नेत्यांना दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी अमित शाहा यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election)भाजपाला अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एक६ निवडणुका लढवणार असून, त्यांना 150 जागांचे टार्गेट अमित शाहा यांनी दिले आहे. तर शिवसेनेनेही 150 जागांचेच टार्गेट ठेवलेले आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवर शिवसेना नेते भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला जमीन दाखवणाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले आहे. मुख्यमंत्रीपद हवे असते तर त्यांना डांबून ठेवू शकलो असतो, त्यांना कोलकात्याला नेता आले असते, असेही ते म्हणाले.
आता जे आहेत ते मूठभर असलेत तरी चालतील पण ते निष्ठावंत हवेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना ही काही आपली खासजी मालमत्ता नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची हाव असतीतर क्षणात पद सोडले नसते असेही त्यांनी सांगितले. आता जे सोबत आहेत ते कट्टर, कडवट शिवसैनिक उरले आहेत, असेही ते म्हणाले.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितले. दसरा मेळाव्यात सगळ्यांचा समाचार घेणार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. यावेळी मुख्यमंत्री नसण्यानं बोलण्यावर मर्यादा नसेल, मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेची एकूण टीम वाढवायची आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.