मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेना नगरसेवकांचा इशारा

| Updated on: Feb 05, 2020 | 11:10 PM

ठाण्याच्या बाळकुम येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्याजागी सायन्स सेंटर बनवण्यात येत आहे, असा आरोप ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेना नगरसेवकांचा इशारा
Follow us on

ठाणे : ठाण्याच्या बाळकुम येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्याजागी सायन्स सेंटर बनवण्यात येत आहे, असा आरोप ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी केला आहे. या सायन्स सेंटर प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. मात्र, “उद्धव ठाकरेंनी उद्घाटन करु नये, अन्यथा राजीनामे देऊ”, असा इशारा संजय भोईर यांच्यासह तीन नगरसेवकांनी दिला आहे (shiv sena corporator opposed science center project).

ठाण्यात सायन्स सेंटर आणि अर्बन फॉरेस्ट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. मात्र, या प्रकल्पाला ठाण्याच्या देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर आणि उमेश भोईर या चार नगरसेवकांनी विरोध केला आहे. खेळाच्या मैदानाची जागा आरक्षित असल्याठिकाणी हे प्रकल्प उभारले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करु नये, असे आवाहन या नगरसेकांनी केलं आहे.

“आम्हाला चार नगरसेवकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता अर्बन फॉरेस्ट आणि सायन्स सेंटरचा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकच विनंती आहे की, आम्हाला खेळाची मैदानं दिली गेलेली नाहीत ते द्यावी. आज ठाण्यात मोठं सिमेंटचं जंगल उभारलं गेलं आहे. या जंगलात मोठमोठ्या 25 मजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. या भागात अनेक तरुण, लहान मुलं राहतात. या मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत. त्यामुळे आम्हाला सायन्स सेंटर नको. आम्हाला खेळासाठी मैदान पाहिजे”, असं शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर म्हणाले.

“राज्य सरकारच्या ठाण्यातील विकास कामांच्या योजनेत कुठेही मैदानांची नोंद करण्यात आलेली नाही. यामध्ये मैदानासाठी कोणतीही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मैदानासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, अशी आमची विनंती आहे”, असेदेखील भोईर म्हणाले.

(shiv sena corporator opposed science center project)