अक्षय मंकणी, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 11 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी भाजपला टोला लगावला आहे. महायुतीत सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर त्यांचा सन्मान करु, असं भरत गोगावले म्हणाले आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन महायुतीत घमासान सुरु असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जागावाटप ठरेल, थोडा धीर धरा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. बाहेर कुणी जागावाटपावर चर्चा करु नका, अशा सूचनाही मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.
“आमचे विद्यमान जागा आहेत, त्या तर आहेतच. पण त्याहीपेक्षा जास्त जागा वाढवून मिळायला हव्यात”, अशी आशा भरत गोगावले यांनी व्यक्त केली. यावेळी भरत गोगावले यांना महायुतीत सन्मान मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गोगावले यांनी 100 टक्के मिळेल, असं भरत गोगावले म्हणाले. “सन्मान नाही देणार तर मग काय करतील, आमचा अवमान करतील का? आम्ही सन्मानाने त्यांच्यासोबत युती केली आहे. ते आमचा अवमान करतील तेव्हा ते त्यांच्या सन्मानाला भोगतील”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.
महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे. भाजपला महाराष्ट्रात 36 जागांवर निवडणूक लढायची आहे. त्यामुळे भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत 35 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 ते 4 आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला 8 ते 10 जागा मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकही पार पडली आहे. पण या बैठकीत काही जागांवर तिढा सुटला नाही. त्यामुळे आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली. पण ही बैठक स्थगित करण्यात आली.
आता महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची भाजच्या केंद्रीय निवडणूक समितीसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही महत्त्वाचे नेते आज दिल्लीत गेले आहेत. भाजपच्या आजच्या बैठकीनंतर महायुतीची बैठक होईल. या बैठकीत मार्ग निघेल का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे अजित पवार गटाला केवळ 3 ते 4 जागा मिळणार असल्याची चर्चा समोर आल्यानंतर पत्रकारांनी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. तेव्हा फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, अशी प्रतिक्रिया दिली.