मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) या निर्णयामुळे शिंदे गटाच्या गोटात चांगलाच आनंद संचारला आहे. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवर ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. निवडणूक आयोगातील लढाई जिंकल्यानंतर आता शिंदे गट कायदेशीरपणे ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. याबाबतचा शिंदे गटाचा मास्टर प्लॅन समोर आलाय.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिंदे गटाचा प्लॅन समोर आलाय. शिंदे गट व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी करण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार आहेत. शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही व्हीपच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचादेखील उल्लेख केलाय.
“सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे दिला नाही तर तुम्ही शिंदे गटाचा व्हीप पाळणार आहात का? की तुम्ही राजीनामा देणार का? लाचारी म्हणून व्हीप पाळणार की स्वाभिमानी म्हणून लाथ मारणार. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत विचारायचं झालं तर नामर्दांसारखा व्हीप पाळणार आहात का? की मर्दांसारखं आमदारकीला लाथ मारणार आहात?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. “तसं काही होत नाही. उलट आता क्लिअर झालेलं आहे. आधीतरी थोडसं हा त्याला, तो याला, एकमेकांना देत होते. पण आता निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा असेल, बरोबर असेल, खरंतर चुकीचाच आहे. दोन पक्षात तुकडे झाले आहेत. आता तसा विषय होणार नाही”, असं अंबादास दानवे म्हणाले.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे-ठाकरे गटाचा वाद हा गेल्या आठ महिन्यांपासून सुरु आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावं, असं वेळोवेळी त्यांच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलंय. पण आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसतोय. त्यातूनच पुण्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून परिस्थिती हाताळली गेली. सुरुवातीला वाद मेटवणं पोलिसांना शक्य होत नव्हतं. पण नंतर वाद निवळण्यात पोलिसांना यश आलं.