लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पण अजूनही महयुतीमधील जागांचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नाशिकच्या जागेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली घडत आहेत. या जागेवर सध्याच्या घडीला शिवसेनेचा खासदार आहे. पण या जागेसाठी आधी भाजप जास्त आक्रमक होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेसाठी जास्त आक्रमक आहे. असं असलं तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकची जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकच्या जागेवर खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे हे आग्रही आहेत.
हेमंत गोडसे यांनी आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या 15 दिवसांत अनेकवेळा भेट घेतली आहे. पण तरीही हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित होताना दिसत नाही. नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत हाय व्होल्टेज घडामोडी घडण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे देखील मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. दादा भुसे यवतमाळचा दौरा रद्द करुन मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. विशेष म्हणजे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेना पदाधिकारी भाऊ चौधरी यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे मुंबईत ठाण मांडून आहेत. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी आणि बैठका घडत आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईत जोरदार खलबतं सुरु आहेत. हेमंड गोडसे काल संध्याकाळपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. ते आज मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे छगन भुजबळ हे देखील नाशिकहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. त्या अनुषंगाने ते आपल्या वरिष्ठांशी मुंबईत बोलतील आणि नाशिकची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतील. दादा भुसे यांचा आज नियोजित यवतमाळचा दौरा होता. पण ते आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरुन महायुीतमधील वाद कमालीचे वाढले आहेत. हेमंत गोडसे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर छगन भुजबळ हे देखील आपली ताकद लावताना दिसत आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत खलबतं होत आहेत. निर्णय नेमका काय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल
नाशिकमध्ये दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांनी या कार्यक्रमात हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित केली होती. पण श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नाशिकमधील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर अचानक नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा तिढा आणखी जास्त घट्ट झालेला बघायला मिळतोय.