गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी होणार? शिवसेनेचे दीपक केसरकर म्हणाले….

| Updated on: May 22, 2024 | 7:05 PM

शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी होणार? शिवसेनेचे दीपक केसरकर म्हणाले....
गजानन कीर्तिकर आणि दीपक केसरकर यांचा फोटो
Follow us on

शिवसेनेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सध्या त्यांच्या पक्षाला साजणार नाहीत अशा काही अनपेक्षित घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपांनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “गजानन कीर्तिकर यांचा मुंबई वायव्य मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न होता. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेऊन ठाकरे गटाचे उमेदवार तथा त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना जिंकून आणायचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता”, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

शिशिर शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून गजनान कीर्तिकर यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते. याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. दीपक केसरकर यांनी याबाबतचं उत्तर देताना महाभारताचा दाखला दिला आहे.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

“महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाने आपला धनुष्यबाण हा खाली ठेवला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की, युद्धात समोर आपला नातेवाईक असेल तरी त्याला शत्रू म्हणून लढायचं असतं. पण असं इथे झालं नाही. गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही. पण ते शांत बसले होते. हे वाद जे होत आहेत त्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा”, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं आहे.

दीपक केसरकर यांचं अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर

दरम्यान, दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “अनिल देशमुख स्वतः तुरुंगात होते. तेव्हा त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता. ते काय गृहमंत्री फडणवीस यांच्या संदर्भात बोलत आहेत? बाल न्याय हक्क कोर्टाने त्या मुलाला सोडलं. पण सरकारने ही केस पुन्हा स्टँड केली ना? मग तुम्ही कसले आरोप फडणवीस यांच्यावर लावत आहात? काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकरणात अर्धवट माहिती देत आहेत आणि दिशाभूल करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी हे पुढच्या पाच वर्षात ते विरोधीपक्षात बसणार आहेत, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.

‘निवडणुकीत फतवे काढून जिंकतात का?’, दीपक केसरकर यांचा सवाल

“मतदान कमी झालं म्हणून ओरड करणारे फतव्यांवर बोलणार आहेत का? फतवे काढून लोकशाहीमधील निवडणूक होणार आहे का यापुढे? धार्मिक संस्था या धर्मासाठी काम करत असतात. ते निवडणुकीत कधी पासून घुसायला लागले आहेत? त्यावर सुद्धा बोललं पाहिजे ना? आणि आम्हाला या फतव्यांची प्रत मिळाली होती. त्यामुळे आम्ही ती प्रत निवडणूक आयोगाला दिलेली आहे आणि त्यासंदर्भात तक्रार केली आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.

“निवडणुकीत फतवे काढून जिंकतात का? हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर ज्यांच्याशी लढा देत होते त्यांच्याशी तुम्ही हात मिळवणी केली आणि त्यांच्या बाजूला जाऊन बसले. माझं उबाठाला आव्हान आहे की फतव्यांशिवाय तुम्ही एक तरी मुंबईमधील जागा जिंकवून दाखवा ना? फतवे कसले काढत आहात? आणि मतदान कमी झालं आहे. त्यासंदर्भात पहिली तक्रार ही आमची होती. त्यांनतर तुम्ही तक्रार करत आहात”, असं दीपक केसरकर यांनी सुनावलं.