मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वारंवार उधाण येत आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची देखील चर्चा आहे. पण त्यानंतर ठाकरे गटाकडून अद्यापल तरी काही प्रतिसाद देण्यात आल्याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून याबात बॅनरबाजी केली जात आहे. असं असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत ही काळ्या दगडावरची कोरलेली रेघ, असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांचा प्रस्ताव घेऊन मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. पण उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातूनच राज ठाकरेंना सोबत घ्यायला विरोध असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
“दोन ठाकरे बंधू एकत्र येऊच शकत नाहीत. काळ्या दागडावरची कोरलेली रेघ आहे. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. राज ठाकरे यांचा प्रस्ताव घेऊन मी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. पण आमच्या उद्धव ठाकरे यांच्या घरच्या माणसांना दोन भावांना एकत्र आणायचं नाही”, असं रामदास कदम म्हणाले.
“राज ठाकरेच आधी पक्षाचं काम करत होते. उद्धव ठाकरे नंतर आले. ते आयत्या बिळावर नागोबा बसले. खऱ्या अर्थाने राज ठाकरे यांनी मेहनत घेतली. त्यांनी सगळ्या सभा घेतल्या”, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात ठाकरे बंधूंबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावेत, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. “बाळासाहेब ठाकरे जेव्हा रुग्णालयात होते तेव्ही मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कटूता दूर करावी. दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांनी बाळासाहेबांचं निधन झालं होतं. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर राजकारण बाजूला सोडा, पण कुटुंब म्हणून आपण एकत्र येतो तेव्हा नक्कीच ताकद वाढलेली दिसते”, असं गडकरी म्हणाले होते.