मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात दोन दिवस दिवाळीत राजकीय फटाके फुटत होते. दोघांमध्ये शिमगा रंगलेला बघायला मिळाला. गजानन कीर्तिकर यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपली बाजू समजावून सांगितली. मीही त्यांना सांगितलं की, भविष्यात आपापसात वाद झाले तर त्यांनी मुख्य नेते मुख्यमंत्री यांच्याशी बोललं पाहिजे. डायरेक्ट प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आपण तशा सूचना गजानन कीर्तिकर यांना द्यावा, अशी विनंती मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली”, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.
“नवीन पक्ष आहे. सगळेजण आपल्यावर विश्वास टाकून आलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक विश्वास लोकांनी आपल्यावर ठेवलेला आहे. असं असताना दोन नेतेच आपापसात भांडत आहेत. मतभेद दोन नेत्यांमध्येच आहेत. हे सुद्धा महाराष्ट्रात भूषणावह नाही”, असं रामदास कदम म्हणाले.
“रामदास कदमवर गद्दारीचा शिक्का आहे, असं बोलणं हे देखील कितपत योग्य आहे? मी आयुष्यभर लढलोय. मला मारण्याच्या अनेक लोकांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या. आज साळसकर जीवंत नाहीत. ते साक्षीदार आहेत. पक्षासाठी मी कफन बांधून रडलोय. माझ्याकडे महाराष्ट्र एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून पाहतोय. पण कोणतीही शाहनिशा न करता रामदास कदमला पूर्ण राजकारणातून संपवायचं म्हणून प्रेसनोट काढणं हे कितपत योग्य आहे?”, असा सवाल रामदास कदम यांनी दिला.
“मी माझ्या आयुष्यात कधीच कंबरेच्या खाली वार केला नव्हता. पण एखादा माणूस घरी बसतो, मी मोठा माणूस म्हणून त्यांचा आदर करतो. पण तुम्ही प्रेसनोस काढून घरी गप्प बसता? ज्या आनंद गितेंनी मला पाडलं त्या आनंद गितेंना पाडण्याचा मी प्रयत्न केला, असं गजाभाऊ सांगतात. माझ्या सख्या भावालाच मी निवडणुकीत पाडलं, असं गजाभाऊ सांगतात?”, असा सवाल कदम यांनी केला.
“आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे राहतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्यात कुठलेही आरोप एकमेकांवर करायचे नाहीत. काही वाटलं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायचं असं ठरलंय. शंकेचं निराकरण झालं आहे. वाद मिटलेला आहे. माझ्या गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये गजानन कीर्तिकर तिथले स्थानिक खासदार आहेत. तेच तिथे निवडणूक लढवतील. ते तिथे निवडणूक लढवतील तर रामदास कदमला कोणतीही अडचण नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.