‘बाळासाहेबांनी नातेवाईकांसाठी कधी सीट सोडायला सांगितली नाही’, सदा सरवणकर यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला

| Updated on: Oct 30, 2024 | 6:30 PM

"एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहा. त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही. तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली", असा टोला सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना लगावला.

बाळासाहेबांनी नातेवाईकांसाठी कधी सीट सोडायला सांगितली नाही, सदा सरवणकर यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला
अमित ठाकरे, सदा सरवणकर
Follow us on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मनसेचे अमित ठाकरे यांना पाठिंबा मिळावा यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. पण महायुतीकडून शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सदा सरवणकर गेल्या 15 वर्षांपासून या मतदारसंघात आमदार आहेत. ते तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पण आता मनसेकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून या निवडणुकीत सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं आहे. कारण सदा सरवणकर यांनी स्वत: ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला देखील लगावला आहे.

सदा सरवणकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिममध्ये राहतात. पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते”, असं सदा सरवणकर म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहा. त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही. तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राज ठाकरेंना मी विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या”, अशी विनंती देखील सदा सरवणकर यांनी केली आहे.