‘नवाब मलिक केवळ मुस्लिम समाजाचे म्हणून त्यांच्यावर गंभीर आरोप’, संजय राऊतांच्या स्फोटक पत्रकार परिषदेचे सर्व मुद्दे

| Updated on: Oct 24, 2021 | 3:26 PM

"नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता", असं संजय राऊत म्हणाले.

नवाब मलिक केवळ मुस्लिम समाजाचे म्हणून त्यांच्यावर गंभीर आरोप, संजय राऊतांच्या स्फोटक पत्रकार परिषदेचे सर्व मुद्दे
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us on

मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरण संबंधातील रोज वेगवेगळी माहिती समोर येत असताना आज एनसीबीच्या एका पंचाचाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्या पंचाने एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेलमधून बाहेर सोडण्यासाठी शाहरुखकडून 25 कोटी मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा खळबळजनक दावा व्हिडीओत करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

‘नवाब मलिकांचा आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता’

“कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता. खरंतर त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळाने ठामपणे उभं राहायला पाहिजे होते. कालपासून एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही पुरावे समोर येत आहेत. जे पुरावे किंवा पंच म्हणून पुढे आले ते कोण होते? किती संशयास्पद चारित्र्याचे हे लोकं होते, त्याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण कशी झाली याचे पुरावे आता समोर आले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

‘काही लोकांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली ते सिद्ध झालं’

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलंय की, अंमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतली आहे. ते आता सिद्ध झालं आहे. आज दोन प्रमुख व्हिडीओ समोर आले आहेत. ते बोलके आहेत. लपाछपवी करण्याची गरज नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने करावी. न्यायालयीन चौकशी करावी कारण हे प्रकरण साधं नाही. फक्त एखादा गोळीबार झाला की न्यायालयीन चौकशी, तर तसं नाही. हे सुद्धा तितकंच गंभीर प्रकरण आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘फिल्म इंडस्ट्रित दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न’

“अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार मुंबई महाराष्ट्रात फारच कामाला लागला आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घरातघरात, बाल्कनीत चरस-गांजाचे पिके काढले जात आहेत, या राज्याचे लोकं अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरु आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचं वैभव आहे. त्या फिल्म इंडस्ट्रितसुद्धा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सुद्धा सिनेसृष्टी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरुन सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावं, अशाप्रकारचे प्रयत्न काही लोकं करत आहेत”, असं राऊत म्हणाले.

‘माझा महाराष्ट्र बदनाम होतोय’

“एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, कारवाई केली. ते ठीक आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. पण सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणापासून मग रिया चक्रवर्तीपासून अन्य काही लोकं असतील, सतत असे गुन्हे निर्माण केले की त्यांच्या कारवाईवर संशय यावा. त्याच्यावर कुणी संशय निर्माण केला की मग आरोप करणाऱ्यांवर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, पाकिस्तानचे ब्रँड अम्बेसिडर आहात, असं म्हटलं जातं. अरे माझा महाराष्ट्र बदनाम होतोय”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

‘महाराष्ट्र सरकारने सुमोटो कारवाई करावी’

“नवाब मलिक यांनी या प्रकरणाच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. पण एकदा या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो मुखवटा आहे, खरा चेहरा आहे तो समोर आला पाहिजे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी असेल तुम्ही महाराष्ट्राला आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काय समजता? आम्ही घाबरत नाही तुम्हाला. तुम्ही आमच्याकडून, आमच्या फिल्म इंडस्ट्रिकडून ज्या खंडण्या उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत हे कोणाच्या सांगण्यावरुन, जी रक्कम काही कोटींमध्ये आहे. पुन्हा तुम्ही या तपास यंत्रणांच्या बाजून उभे राहतात, अधिकाऱ्यांची वकिली करतात, तुम्हाला महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी प्रेम नाही? तुम्हाला राज्याची बदनामी करण्याची जी उर्मी आलीय ते उघडी पडली आहे. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी सुमोटो कारवाई केलीच पाहिजे. आमच्या सारखे लोकं यामध्ये भरडले जातात. आम्ही घाबरत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्य समोर जावं लागतं. आम्ही सामान्य कुटुंबातील लोकं आहोत. पण ईडीच्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागतं. असे अनेक लोकांना जावं लागतं”, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले ते पाहा :

हेही वाचा : बॉलिवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणून बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; संजय राऊत यांचा आरोप