मुंबई | 20 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मूंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते येत्या 26 जानेवारीला मुंबईत दाखल होती. त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न केले गेले. पण मनोज जरांगे ऐकून घेण्यास तयार नाहीत. त्यांच्या या भूमिकेवर सत्ताधारी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. येत्या फेब्रुवारी महिन्यात अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होईल, अशी महत्त्वाची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यावर काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी मराठा आंदोलकांना आपल्या आंदोलनाचा इतर समाजकंटकांनी फायदा घेऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं.तसेत शिरसाट यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास आपल्या कामात आहेत. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करत आहेत. त्यांची दुपारी बैठक आहे. कुणाच्याही टीका-टीप्पणीने ते काम थांबवत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं अहोरात्र काम सुरु आहे. त्यांचं काम तसंच पुढे चालत राहणार. आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की, इतर लोक आपल्या आंदोलनाचा फायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्या. तुम्हाला आरक्षण फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन काळात मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. याबाबत चिंता करण्याचं कारण नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, त्यानुसार ते मुंबईचे दिशेने येतात. आपण ज्या कारणाने आंदोलन करतो, जी मागणी आहे त्यावर सरकारने त्यांना सकारात्मक घेतले की नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनात आता मुख्यमंत्र्यांपासून सर्वच सहभागी झालेले आहेत. एकनाथ शिंदे जे करत आहेत ते इतर कुणी केलेलं नाही. पण तरीही त्यांना अडचणीत कसं आणायचं हा काही लोकांचा डाव आहे, काही लोकांना आंदोलन चिघळायचं आहे ते जरांगे यांनी समजून घ्यायला हवं”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं
“भावनेच्या भरात आपण पुढे चालत असलो तर इतरांनी त्याचा फायदा घेऊ नये याची काळजी घ्या. सरकार आणि आंदोलन कर्त्यांमध्ये कुठेतरी वाद व्हावा, संवाद साधू नये ही अनेकांची भूमिका आहे. यासाठी सगळेजण डोळे लावून बसलेले आहेत. पण एकनाथ शिंदे भूमिका घेतात आणि त्यावरती ठाम असतात ही सर्वांना पोटदुखी आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “अडीच वर्षे सत्ता होती आणि आज जरांगे पाटीलला पैदा बोलतात, जरांगे पाटील यांनी त्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे. आम्हाला त्यांच्यामध्ये राजकारण करायचं नाही. ही लोकं राजकारण समाजामध्ये भांडण लावण्यासाठी करतात. मात्र राजकारण समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी करायचं असतं हे काम एकनाथ शिंदे करत आहेत”, असं शिरसाट म्हणाले.
“शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. शरद पवार स्वत: आरोपी आहेत. त्यांनीच मराठा समाजाला झुलवत ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणासाठी काम करत आहेत. त्यामुळे कालचा पोरगा मला ओव्हरटेक करतोय ही अडचण झालीय. त्यामुळे त्यांची ही बोंबाबोंब सुरू आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर केली.