मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांच्या टीकेला अर्थ नाही. मुर्खासारखे त्यांचे स्टेटमेंट आहेत. शिवसेना पक्षप्रमुखाचे विचार यांनी सोडले. त्यांना जे आवडतं नव्हते ते आचरणात आणलं, आत्ता ज्ञान पाजळत आहेत. आम्ही गोधडीत होतो पण तुम्ही त्या स्टेजवर होता का? डोममध्ये घेतलेला कार्यक्रम पाऊस, पाणी पाहून घेतलाय. तुमची सर्व कामे आम्ही करत आहोत. याच डोममध्ये तुमच्या विरोधात राहुल नार्वेकर यांनी तुमच्या विरोधात निर्णय दिला तेव्हा हे डोम कावळे काय करत होते? संजय राऊत यांनीच लांडग्याचे कातडं पांघरलं आहे. कातडं आमच्यावर नाही तुमच्यावर आहे. कातडं पांघरून तुम्ही शरद पवार आणि राहूल गांधी यांच्या पायाशी जाऊन बसले”, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लोकसभेनंतर अहंकार आलाय, त्यांची बाजू संजय राऊत घेत आहे. नाना पटोले यांचे पाय धुतल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही म्हणून कार्यकर्ते त्यांचे पाय धूवत आहेत. महिला नानांना माफ करणार नाही. मग महात्मा गांधींचा वारसा कसा जपत आहेत? महिला वर्गात नाना पटोलेंबाबत चीड आहे. त्यांची विधानसभेत मस्ती उतरवू”, अशा तिखट शब्दांत संजय शिरसाट यांनी टीका केली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल निर्णय घेतील. अजितदादा सोबत राहावे ही आमची इच्छा आहे. भाजपबाबत मी चर्चा करणं योग्य नाही. आम्ही वळून पाहत नाहीत. ती सवय संजय राऊत यांना आहे. आम्हाला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझं मत मांडलं होतं. आता काही बोलणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. देवेंद्रच त्यांना जवळून ओळखत आहेत. त्यामुळे ते असं बोलत असावेत”, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.
“मंत्री छगन भूजबळ न सुटणारं कोडं आहे. त्यांची भूमिका संशोधनाचा विषय आहे. यावर भाष्य करणं जिकरीचं ठरेल. भूजबळांना कोणता बांबगोशा कुठे टाकायचा हे माहीत आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले. यावेळी शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. “कॅबिनेट विस्ताराबाबत कल्पना नाही, दोन्ही नेते निर्णय घेतील त्याची आम्ही वाट पाहू”, असं संजय शिरसाट म्हणाले. “संजय निरूपम यांनी विधानसभेच्या जागेबाबत मोठा भाऊ भाजप आहे असं विधान केलंय. लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळे याचं क्रेडिट घेतलंय”, असं शिरसाट म्हणाले. “आमचं कौटुंबिक प्रेम आहे आम्ही वाद घालत नाही. जागेचा दावा काय असेल ते मुख्यमंत्री ठरवतील”, अशीदेखील प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.