मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) गेल्या दोन दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मुंबईत शिवसेना आणि भाजपच्या आशीर्वाद यात्रेदरम्यान कुणीतरी त्यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत संभाषण करतानाचा व्हिडीओ बनवला आणि तो मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे मोठा वाद उफाळला. पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली. त्यानंतर शीतल म्हात्रे यांनी आणखी एक मोठा खळबळजनक दावा केलेला. दोन संशयितांनी आपला पाठलाग केला, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. त्यांनी या प्रकरणी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आज पुन्हा महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
याशिवाय शीतल म्हात्रे यांच्या गाडीचा काही दिवसांपासून अज्ञात लोक पाठलाग करत असल्याचे त्यांच्या सुरक्षा रक्षकाला ही बाब लक्षात आली. त्यानंतर या प्रकरणात पोलीस गुन्हा नोंद करून घेत आहेत. याच प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे शीतल म्हात्रे स्वत: आज दादर पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी शीतल यांचा जबाब नोंदवून घेतला.
या प्रकरणात पोलिसांचा अधिकचा तपास सुरु आहे. शीतल म्हात्रे आज दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या त्यावेळी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे सुद्धा त्यांच्यासोबत आले होते. पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे संशयित इसम हे हल्ला करण्याच्या तयारीत होते की काय? असं त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत होतं, असा दावा शीतल म्हात्रे यांनी केला. यावेळी शीतल म्हात्रे यांनी काल आपल्यासोबत घडलेला सर्व थरार सांगितला.
“मी काल सहपोलीस आयुक्तांना भेटून पत्र दिलं होतं की, काल शिवाजी पार्क येथून मंत्रालयाच्या दिशेला जात असताना सिद्धिविनायक मंदिराजवळ एका बाईकवरुन दोन इसम माझा पाठलाग करत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर आमची गाडी वेगाने पुढे नेली. त्या इसमांचा इरादा आणि हावभाव योग्य वाटले नाही. त्यांची हल्ला करायची इच्छा आहे की काय? असं वाटत होतं. त्यामुळे मी त्याबाबतचं पत्र सहपोलीस उपायुक्तांना दिलं”, अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली.
“मी आज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला आलेली आहे. कारण पूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे मला खात्री आहे, पोलिसांना लवकरच आरोपी सापडतील. त्यामुळे त्या पद्धतीने मी माझा जबाब नोंदवलेला आहे. पोलीस त्या पद्धतीने कारवाई करतील”, असा विश्वास शीतल म्हात्रे यांनी वर्तवला.
“आता परिस्थिती अशी आहे की, सर्वच ठिकाणी संशय व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कुणावर संशय घ्यावा, असं वातावरण आहे. या पातळीवर कुठला पक्ष उतरेल त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. एकीकडे बदनामी तर करायचीच, त्यापुढे जाऊन जीवाला सुद्धा बरं-वाईट करण्याची परिस्थिती एखाद्या पक्षावर आलेली असेल तर हे राजकारण कोणत्या दिशेला चाललंय? हे महाराष्ट्राचं राजकारण असूच शकत नाही”, अशी भूमिका शीतल म्हात्रे यांनी मांडली.