तब्बल 18 वर्षांनी ‘या’ खास व्यक्तीची भेट, सुषमा अंधारे फेसबुकवर भावूक

| Updated on: Feb 16, 2023 | 9:39 PM

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना तब्बल 18 वर्षांनी त्यांचा मावस भाऊ भेटला आहे. सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.

तब्बल 18 वर्षांनी या खास व्यक्तीची भेट, सुषमा अंधारे फेसबुकवर भावूक
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना तब्बल 18 वर्षांनी त्यांचा मावस भाऊ भेटला आहे. सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. यासोबत सुषमा अंधारे यांनी यासाठी आमदार सचिन अहिर यांच्यासह युवासैनिकांचे आभार मानले आहेत. नियतीलासुद्धा आम्हाला वाट बघताना पाहून पान्हा फुटला, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेला मी कुटुंब मानलं शिवसेनेने माझं कुटुंब सावरलं, असं देखील सुषमा म्हणााल्या आहेत.

सुषमा अंधारे यांची नेमकी भावनिक पोस्ट काय?

तुमच्या दृष्टीने सगळ्यात वाईट आणि जीवघेणं काय असेल? मला वाटतं कुणीतरी येण्याची वाट बघणं. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणं… काही तास.. दिवस.. आठवडे.. महिने नाही तर वर्षानुवर्ष वाट बघत राहणं. अंतहीन.. अमर्याद.. अनिवार.. फक्त आणि फक्त त्या वाटेकडे डोळे लावून बसणं.

माझ्या कुटुंबाने अशी तब्बल अशी अनिवार अंतहिन आणि अमर्याद वाट पाहिली. शक्य ते सगळे प्रयत्न केले. पण काल अचानक नियतीलाही आमचं हे वाट बघत राहणं बघून जणू पान्हा फुटला.

हे सुद्धा वाचा

आमचं संयुक्त कुटुंब आहे. कुटुंबात तब्बल 48 माणसं आहेत. तब्बल 18 वर्षांपूर्वी आमचा भाऊ घरातून कुणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेला. सुरुवातीला दोन-तीन दिवस तो कुठेतरी गेला असेल परत येईल असं वाटलं. अनेक ठिकाणी चौकशी केली.

टीव्ही किंवा वर्तमानपत्रात हरवल्याची जाहिरात दिली तर त्याच्या जीवाला धोका होईल का? अशी एक भाबडी भीती कुटुंबियांना वाटत होती. महिने उलटून गेले, वर्ष उलटली, पण तो काही परत आलाच नाही.

मध्ये दोन-तीन वेळा तो वेगवेगळ्या ठिकाणी असण्याची माहिती मिळाली. कधी पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या मदतीने त्याला सासवडमध्ये शोधायला आम्ही गेलो. तर कधी वाघोली खराडी पुणे स्टेशन किंवा कधी राज्याच्या बाहेर. पण त्याचा काही पत्ता लागला नाही.

परवा दिवशी गोरेगावमध्ये शिव संवाद यात्रेची सभा झाली आणि बांद्रापासून गोरेगावपर्यंत दूतर्फा सभेच्या निमित्ताने बॅनर्स झळकले. कसे कुठून त्याच्या नजरेला हे बॅनर्स पडले आणि ही बॅनरवर असणारी व्यक्ती माझी बहीण आहे हे त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला सांगितले.

त्याच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार आणि विश्वास ठेवला तरी संपर्क कसा होणार. कारण घरातला जुना लँडलाईन नंबर आता इतिहासजमा झालाय. सबुक आणि इतरत्र माझा संपर्क क्रमांक शोधायला सुरुवात झाली आणि मित्र यादीमध्ये माझा दुसरा भाऊ धनराज याच्या फेसबुक पोस्टवर संपर्क क्रमांक त्याला मिळाला.

त्याने स्वतःहून काल फोन केला. बारामतीचा मेळावा आटोपून पाच वाजता मी परतताना त्याचा फोन धडकला. मी मुंबईत आहे,असे सांगितले. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे निघालो. पण नंतर मात्र फोन अचानक बंद झाला. वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या

अशा वेळेला मदतीला कोण असेल? आणि जेव्हा कधी मदत मागायची कोणाला? असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्याचं उत्तर म्हणून एकच नाव पुढे असतं ते म्हणजे माननीय आमदार सचिन भाऊ आहिर.

भाऊंना फोन केला . ज्या नंबरवरून त्याचा फोन आला होता लोकेशन ट्रॅक केलं. माहीम कोळीवाडा किंवा बांद्रे परिसरामध्ये मदत हवी आहे म्हटलं आणि भाऊंनी तात्काळ युवा सेनेच्या सगळ्या टीमला सांगितलं.

उपसचिव जय सरपोतदार, अरुण कांबळे ही मंडळी तात्काळ आपल्या टीमसह येऊन दाखल झाले. राहुल कनाल यांनीही फोनवरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणे सुरू ठेवला.

साडेनऊ वाजता सुरू झालेली शोध मोहीम रात्री दीड वाजता थांबली. माहीम कोळीवाडा बांद्रे पश्चिम जामा मस्जिद लिंक रोड के सी मार्ग फायर कॅम्प, मिठी नदीच्या कडेने आणि काल रात्री दीड वाजता आम्हाला अठरा वर्षांपूर्वी आमच्यापासून दुरावलेला भाऊ मिळाला.

जय सरपोतदार – विभाग अधिकारी उपसचिव युवासेना, अरुण कांबळे-विधानसभा चिटणीस, नरेश मिस्त्री-उपविभाग अधिकारी, सागर राणे- विधानसभा समन्वयक, श्वेतांग तांबे विधानसभा समन्वयक राज मोडक शाखा अधिकारी जगदीश राघव शाखा अधिकारी,सिद्धेश जाधव शाखा समन्वयक आनंद फुले,उपशाखाप्रमुख निखिल डहाळे युवा सैनिक गौरव मोरे, युवा सैनिक परेश युवासैनिक आणि विशेषतः सचिन भाऊ आहेर यांचे माझे संपूर्ण कुटुंबीय कायम ऋणी असेल.