भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उबाठामधील राजकीय वैर संपण्याची चिन्ह नाही. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेद्र फडणवीस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उघड आव्हान दिले. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार, असा थेट इशारा देत आता ‘आर किंवा पार’ची राजकीय लढाई सुरु केली. सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेले तर तोडून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडले नाही. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती हल्ले केले. बाळासाहेब यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही, असे त्यांनी म्हटले.
सर्व सहन करुन मी जिद्दीने उभे राहिलो आहे. आता राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार आहे. मुंबईत राहून तुम्ही मराठी माणसाला घर देणार नाही, नोकरी देणार नाही. चालले तरी काय? जिकडून तुम्ही आला आहात, तिकडे जा. आता या ठिकाणी प्रचाराला या. मग तुमची उरली सुरली गुरमी उतरवतो, असे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता म्हटले. त्यांना शिवसेना संपवयाची आहे. त्यांच्याकडे एका बाजूला सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा आहेत. परंतु माझ्या बाजूला कार्यकर्ते आहेत.
मुंबईतील निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे होती. त्यानंतर त्यांचे उरले सुरले कपडेही उतरवले असते. तुम्ही आमदार, खासदार खरेदी केले असतील पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते खरेदी करु शकत नाही. बूटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
सत्तेवर आल्यावर धारावीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आदानींचे टेंडर रद्द करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी कंत्राटदार माझा लडाक योजना सुरु केली आहे. पण ही योजना चालणार नाही.