सर्वात मोठी बातमी, दीपक केसरकर यांच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

| Updated on: Jun 20, 2023 | 10:38 PM

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या दिवशीच दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

सर्वात मोठी बातमी, दीपक केसरकर यांच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज 20 जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं असतं, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केलाय. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये पडसाद पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

“एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेलं आहे. गद्दार कुणाला म्हणता? मी असा मनुष्य बघितलाय, मी आजपर्यंत मीडियासमोर कधी बोललो नव्हतो. माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते समजा रागून निघून गेले होते, तर त्यांनी परत येण्याची तयार दाखवलेली होती”, असं दीपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की, माझी चूक झालेली आहे. पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“असं म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, त्याच्यात कशाप्रकारची माणुसकी असते, माझ्यामुळे एकाही आमदाराचं नुकसान होता कामा नये, त्यांचं राजकीय नुकसान होता कामा नये. प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल. असं म्हणणाऱ्या माणसासोबत लोकं उभं राहणार नाहीत तर कुणासोबत उभं राहणार?”, असा सवाल त्यांनी केला.

दीपक केसरकर यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या अपमानाची आठवण

दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील अपमानाची आठवण करुन दिली. उद्धव ठाकरे 19 जून 2022 ला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात “आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, असं म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याची दीपक केसरकर यांनी आठवण करुन दिली.

“एकनाथ शिंदे यांचा ज्यादिवशी अपमान झाला तो दिवस सुद्धा वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्याचा अत्यंत अपमान केला. त्याला खालची वागणूक दिली. ते आमचे विधीमंडळ नेते होते. त्यांचा अपमान तुम्ही का केला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे”, असं दीपक केसरकर म्हणाले.