मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार वर्षभरापासून रखडलेला आहे. विशेष म्हणजे आता सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी झाला आहे. त्यामुळे आता हा विस्तार नेमका कधी होईल? याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर आज पुन्हा रात्री उशिरा ही बैठक पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
“राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार होता, झाला नाही. मंगळवारी होणार होता, झाला नाही. कदाचित बुधवारी होईल, गुरुवारी होईल, शुक्रवारी होईल, पण लवकरात लवकर होईल ना. कधीतरी होणार, लवकरात लवकर नक्की होईल”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जवळून बघितलेलं आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्हे विभागणीय त्यांना माहिती आहेत. कुठचे आमदार कुठे निवडून आले आहेत, हा समतोल कसा राखायचा ते त्यांना माहिती आहे. संख्येनुसार आपल्याला काय पाहिजे, काय नको, हे तीनही लोकांना माहिती आहे. त्यामुळे आपल्याला जे काही कळतंय ते सगळं चुकीचं आहे. अतिशय समन्वय आणि समतोलाने तीनही नेते खात्याचं वाटप करतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल”, असं उदय सामंत म्हणाले.
अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे काही दिग्गज नेते आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार खातं मिळेल का? असा प्रश्न सामंत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हा लोकशाहीतला एक भाग आहे. एखादा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असेल तर त्याला चांगलं खातं मिळावं हा प्रत्येकाचा आग्रह असू शकतो. पण ते मिळेलच असं नाही ना? म्हणून मी सांगतो, सगळी भौगोलिक परस्थिती, राज्याचे सर्व विभाग, सगळे आमदार यांचं तीनही नेत्यांना भान आहे. ते सगळा समतोल ठेवून खातेवाटप करतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तारही करतील”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.