महायुतीच्या बैठकीआधी आतली बातमी फुटली, बड्या मंत्र्यानेच सांगितली Inside Story

| Updated on: Aug 31, 2023 | 5:02 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज रात्री साडेआठ वाजता महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याबाबत एका बड्या मंत्र्याने महत्त्वाची माहिती दिलीय.

महायुतीच्या बैठकीआधी आतली बातमी फुटली, बड्या मंत्र्यानेच सांगितली Inside Story
Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde
Follow us on

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीआधी बंगळुरु आणि पाटणा येथे महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर तिसरी आणि अतिशय महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासह 28 पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं होणार आहेत.

विरोधी पक्षांमधील या हालचाली पाहिल्यानंतर सत्ताधारी पक्षातही घडामोडी वाढल्या आहेत. विरोधी पक्षांची बंगळुरुत बैठक झाली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत एनडीएची बैठक बोलावली होती. त्यानंतर विरोधी पक्षांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर महायुतीकडूनही बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज रात्री साडेआठ वाजता महायुतीची बैठक असणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला. एकीकडे विरोधकांच्या गोटात हालचाली वाढलेल्या असताना आता सत्ताधारी पक्षांच्या गोटातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान, महायुतीच्या या बैठकीत नेमकं काय घडणार, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत यांनी सांगितली आतली बातमी

उदय सामंत यांनी महायुतीत घडणाऱ्या घडामोडींची आतली बातमी सांगितली आहे. “आमच्या बैठकीत लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत”, अशी महत्त्वाची माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच “आम्हाला पूर्ण खात्री आहे की, आमचं मिशन हे 48 चं आहे. आम्ही तिथपर्यंत नक्की पोहोचू”, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला.

“आमचं भोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी होणार आहे. तिथे आमचा मराठमोळा बेत आहे. आमचं जेवण हे कुठेही फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नाही. आमची बैठक कुठेही फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नाही. आमच्यादेखील बैठका झाल्या. पण याच लोकांनी टीका केल्या होत्या. टीका होतात म्हणून आम्ही बैठका स्पोर्ट्स क्लबला घेतोय, असा विषय नाही”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.