कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात ही सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा आज जबाब नोंदवण्यात आला. पहिल्या सत्राच्या वेळी सुनील प्रभू त्यांच्या वकिलांसोबत असताना जबाब देत होते. पण त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभेच्या सभागृहात साक्ष नोंदवण्यासाठी विटनेस बॉक्स आणण्यात आला. दुपारच्या सत्रात सुनावणी सुरु झाली तेव्हा सुनील प्रभू यांनी विटनेस बॉक्समध्ये उभं राहून साक्ष नोंदवली. यावेळी जोरदार खडाजंगी झाली. शिंदे गटाच्या आमदारांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी एक गंभीर आरोप केला.
दुपारच्या सत्रात पुन्हा आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणीला सुरुवात झाली. सुनील प्रभू यांना व्हिटनेस बॉक्समध्ये बसवण्यात आलं. “आपण याचिकेत कशाच्या आधारे हा आरोप केलाय की भाजप हे भ्रष्ट हेतूने चुकीच्या प्रभावाने काम करत होते?”, असा प्रश्न सुनील प्रभूंना शिंदे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं. “आम्ही 2019 साली काँग्रेस, एनसीपीसोबत सरकार बनवलं. त्यात एकनाथ शिंदे हेही मंत्री होते. मात्र विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दबावतंत्रात येऊन नियमबाह्य पद्धतीने वागले. भ्रष्ट मार्गाने भाजप वागली आणि म्हणून हे सगळं घडलं या अनुषंगाने मी हे म्हटलं होत”, असा जबाब सुनील प्रभू यांनी दिला.
“या संदर्भात तुम्ही जे केलेलं वक्तव्य आहे ते फक्त मत आहे की तसा तुमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे?”, असा उलटसवाल शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यावर प्रभू यांनी भूमिका मांडली. “मी ज्या पक्षाचा आमदार आहे, आमच्या पक्षाचे अनेक आमदार पळून जात होते, त्यामुळे त्यांना कोणीतरी पळवून नेलं असावं, त्यांच्यामागे कोणीतरी असावं असं बोललं जातं होतं म्हणून माध्यमात चर्चा होती, म्हणून मला जे वाटलं ते मी त्यात नमूद केलं आहे”, असं उत्तर सुनील प्रभू यांनी दिलं.
“देशाचा नागरिक म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी खोटं बोलणार नाही. मला देशाच्या संविधानिक यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे”, असं सुनील प्रभू म्हणाले. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी “तुमची उत्तर पाहता तुमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही असं दिसतंय”, असा आरोप केला. त्यावर “माझ्या बाबतीत असं म्हणणं गैर आहे. मी सविधानाचा अपमान केलेला नाही. मी लोकशाहिचा आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो”, असं सुनील प्रभू म्हणाले.
यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी गंभीर आरोप केला. सुनील प्रभू जे सांगतायत ते व्यवस्थित नोट केलं जात नाही. प्रभू यांनी जबाब नोंदवताना बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊनही ते नमूद केलं गेलं नसल्याचा आरोप वकील कामत यांनी केला. देवदत्त कामत यांनी असा प्रश्न उपस्थित करताच अध्यक्षांनी कामत यांनाच प्रभूंना इंफ्ल्युएन्स केल्याचं म्हटलं. यावरही कामात यांनी जोरदार आक्षेप घेतला. कामत यांनी यावर आक्षेप नोंदवत मी आजवर अनेक केसेस लढल्या. मात्र माझ्या पूर्ण कारकीर्दीत असा आरोप माझ्यावर कोणी केला नाही, असं अध्यक्षांना म्हटलं.
“प्रभू जे बोलतायत ते नीट ट्रान्सलेट केलं जात नाहीय. तुम्हाला शक्य होत नसेल तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ट्रान्सलेट करण्यास सांगा”, असं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानसभा अध्यक्षांना म्हणाले. “सुनील प्रभू जे बोलतायत ते आहे तसं रेकॉर्डवर घ्या. माझा ट्रान्सलेशनवर विश्वास नाही. आमचं म्हणणं मराठीतच रेकॉर्ड करा”, अशी मागणी वकील देवदत्त कामत यांनी केली. देवदत्त कामत यांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली. ठाकरे गटाच्या मागणीनंतर सुनील प्रभू यांची उलटतपासणी दरम्यानची उत्तरे मराठीत नोंदवली गेली.
“एकनाथ शिंदे जेव्हा आमदारांसहीत सुरतला गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक भेटायला गेले होते हे खरंय का? याचिकेत म्हणण्यात आलंय की एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यापासून संपर्कात नव्हते. पण मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून तिकडे जाऊन भेटले. हे खर आहे का?”, असा सवाल शिंदे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर प्रभू यांनी “एकनाथ शिंदे संपर्कात नव्हते हे खरंय. पण मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी कशासाठी भेट घेतली ते मला माहिती नाही”, असं उत्तर दिलं.
यानंतर आजची सुनावणी संपली. या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या पुन्हा साडेअकरा वाजता सुनावणी सुरु होईल. विशेष म्हणजे उद्यापासून सलग तीन दिवस अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यानंत 28 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत सलग सुनावणी होणार आहे.
याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुनील प्रभू यांच्यासोबत व्हीप बजावणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचीदेखील साक्ष नोंदवली जाणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून अद्याप साक्ष नोंदवणाऱ्याची यादी येणे बाकी आहे. उद्यापासून सलग होणाऱ्या सुनावणीत साक्ष नोंदली जाणार आहे. त्यामुळे अपात्रतेच्या याचिकेवरच्या सुनावणीस आता वेग येताना दिसतोय.