मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या सर्व मंत्री, आमदार-खासदार आणि पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह आज अयोध्येच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. खरंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा ऐतिहासिक आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना सोबत घेऊन अयोध्येला जाणं ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. अयोध्या हा विषयच भक्ती आणि शक्तीच्या दृष्टीकोनातून संवेदनशील मुद्दा होता. अनेक वर्ष सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यानंतर आता तिथे भव्य राम मंदिर साकारलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांचा आजपासून दोन दिवसांचा अयोध्या दौरा आहे. एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार-खासदारांसह मुंबई विमानतळावरुन लखनौच्या दिशेला रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावर आज दुपारी साडेतीन वाजताच सर्व आमदार जमले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच सूचना दिलेल्या. त्या सूचनांनुसार सर्व आमदार-खासदार मुंबई विमानतळावर जमले. यावेळी सर्वांमध्ये उत्साह संचारलेला बघायला मिळाला.
शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांसह संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विमानात बसले. त्यानंतर त्यांच्या विमानाने काही वेळाने लखनौच्या दिशेला उड्डाण घेतलं. आमदार विमानतळावर होते तोपर्यंत सर्व इत्यंभूत माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत होती. पण ते विमानाने प्रवास करत असतील तेव्हा त्यांचा उत्साह कसा असेल? सर्व आमदार-खासदारांचा नेमका विमान प्रवास कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता होती.
राज्यातील जनतेला आमदार-खासदार यांचा विमानप्रवास बघायला मिळावा यासाठी आम्ही आमदार प्रकाश सूर्वे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी विमानातील आतली दृश्य दाखवली. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काही आमदार श्रीरामांच्या घोषणा करताना दिसले. मोबाईलचा कॅमरा जसा पुढे सरकरत होता तसे अनेक आमदार नमस्कार करताना दिसले, अनेकांनी हात दाखवत आनंद व्यक्त केला. आमदार प्रकाश सूर्वे यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून एका कुशल पत्रकारासारखं सर्वसामान्य जनतेला विमानाच्या आतील उत्साह दाखवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांसह उद्या अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारकडूनही चांगलाच बंदोबस्त करण्यात येतोय. मुख्यमंत्री आणि सर्व आमदार-खासदारांच्या आदरातिथ्यात काहीच कमी पडू नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उद्या अयोध्येच्या दौऱ्यासाठी जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येतेय.