गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण उदयास आलं. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदही मिळालं. त्यामुळे अनेकांच्या मंत्रीपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आता राज्यात आपलंच सरकार आहे. त्यामुळे काही फिकीर नाही. लोकांची कामे झटपट होतील. झटपट निर्णय होतील. कुठेही अडवलं जाणार नाही. कुणालाही सहज भेटता येईल, असं शिंदे गटातील अनेकांना वाटत होतं. मात्र, शिंदे गटाच्या एका आमदाराला एक धक्कादायक अनुभव आला आहे. या आमदाराला थेट मंत्रालयाच्या एका गेटवरच प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे सर्वाधिक चर्चेतील आमदार संजय शिरसाट यांना हा अनुभव आला आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांशी हुज्जतही घातली. पण पोलिसांनी ताकास तूर लागू दिला नाही. त्यामुळे शिरसाट कमालीचे अस्वस्थ झाले होते. शेवटी या प्रकरणात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे. पण आपलंच सरकार असताना अशी वागणूक मिळाल्याने संजय शिरसाट दुखावले गेल्याचं सांगितलं जात आहे.
काल मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीमुळे मंत्रालय परिसरात गर्दी झाली होती. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आमदार संजय शिरसाट स्वत:च्या गाडीने मंत्रालयाच्या ‘जनता जनार्दन’ (मुख्य) प्रवेशदारावर पोहचले. मात्र पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. ‘तुम्हाला येथून जाता येणार नाही, तुम्ही गार्डन गेटने जा’ असं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शिरसाट यांना सांगितलं. त्यावर शिरसाट भडकले. त्यांचा रागाचा पाराच चढला. ‘मी आमदार आहे. तुम्ही ओळखत नाही का? हा नियम कोणी केला? गेली 15 वर्षे मी येथून जातो- येतो. तेव्हा कधी मला अडवलं गेलं नाही. आता कसे काय अडवता?’ असा सवाल शिरसाट यांनी केला. तसेच याच मुख्य प्रवेशदाराने जाण्याचा हट्ट त्यांनी धरला.
यावेळी संजय शिरसाट आणि पोलिसांची चांगलीच बाचाबाची झाली. पोलीस शिरसाट यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण शिरसाट काही ऐकायला तयार नव्हते. मंत्रालय सुरक्षेचे नियम बदलण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशदाराने केवळ मंत्र्यांच्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. आमदार आणि इतरांच्या वाहनांना गार्डन गेटने प्रवेश असून आरसा गेटने बाहेर पडता येणार असल्याचा नियम केलाय, असं पोलिसांनी शिरसाट यांना सांगितलं.
पण शिरसाट काही ऐकेनाच. पोलीस आणि शिरसाट यांच्यातील वाद सुरू असल्याने या गेटवर गर्दी झाली. त्यानंतर दादा भुसे यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा पाडला. मात्र, शिरसाट चांगलेच भडकलेले दिसत होते.