मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आजच सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. तसेच उद्याच म्हणजे 20 फेब्रुवारी या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या कॅव्हेटला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्टे देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याचे दाखलेही या याचिकेतून देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाचा निर्णय दोषपूर्ण आहे. हा चुकीचा निर्णय असल्याचं सांगत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही याचिकेतून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी कोर्टात हा याचिका मेन्शन केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरील त्रुटीवर आम्ही बोट ठेवणार आहोत. शिवसेनेच्या संविधानातील बदल एकतर्फी असून अलोकतांत्रिक असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. शिवसेनेच्या संविधानातील दुरुस्तीशी सहमत नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. त्यावरच सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला जाणार असल्याचं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनाही याच घटनेनुसार नेतेपद देण्यात आलं होतं. त्याला निवडणूक आयोगाने योग्य ठरवलं. मग उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी संविधान चुकीचं कसं ठरू शकतं? आमदार आणि खासदारांना मिळालेली मते ग्राह्य धरण्यात आली आहेत. मग जे उमेदवार पराभूत झालेत. त्यांची मतेही ग्राह्य का मानली गेली नाही? ती मतेही जनतेनेच दिली होती, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाची थोड्याच वेळात मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाच्या याचिकेसंदर्भात ही बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
उद्या सकाळी 9.30 वाजता ही बैठक होणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ही बैठक बोलावली आहे. शिंदे गटाचा व्हीप लागू होतो की नाही? तो मानायचा की नाही? वेगळा पर्याय काय आहे? यासह इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं.