मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी? या मुद्द्यावरुन प्रत्येक पक्षाच्या गोटात पडद्यामागे प्रचंड हालाचाली सुरु होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा बैठक देखील पार पडल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर भाजपकडून आज तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जी नावं शर्यतीत होती त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. भाजप नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण यापैकी एकाही नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याउलट भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्या मेधा कुलकर्णी, काँग्रेसमधून भाजपात सामील झालेले अशोक चव्हाण आणि नांदेडमधील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने एका जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे.
पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेच्या निवडणुकीत महायुती पाच जागांवर सहज निवडून येण्याची शक्यता आहे. यामध्ये तीन जागा भाजप, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट प्रत्येकी एक जागेवर सहज निवडून येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने एक महत्त्वाच्या प्रश्न निर्माण झालाय. मिलिंद देवरा हे 55 वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांचे वडील काँग्रेसचे दिग्गज नेते होते. इतके वर्ष काँग्रेससोबत काम केल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मिलिंद देवरा यांची दक्षिण मुंबई मतदारसंघात मोठी ताकद आहे. ते 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा जिंकून आले होते. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होईल, असे संकेत मिळत होते. पण आता शिंदे गटाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार? ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी शिंदे गटाकडे मिलिंद देवरा यांच्या इतका ताकदवान नेता मिळणं कठीण मानलं जातं. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुती काय खेळी करणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.