महायुतीची मुंबईत सर्वात मोठी खेळी, अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात ‘या’ दिग्गजाला उमेदवारी? भाजपची एक जागा शिवसेनच्या पथ्थ्यावर पडणार?

| Updated on: Apr 12, 2024 | 6:31 PM

महायुती आता मुंबईत धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी ते आता तितक्याच ताकदीचा मोठ्या नेत्याला उमेदवारी देणार आहेत. तर मुंबईतील भाजपची एक जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील एका जागेसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची देखील चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीची मुंबईत सर्वात मोठी खेळी, अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात या दिग्गजाला उमेदवारी? भाजपची एक जागा शिवसेनच्या पथ्थ्यावर पडणार?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत महायुतीत सर्वात मोठी राजकीय खेळी होताना दिसणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा झटका दिला. कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जाणारे नेते रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी राजकीय हानी होती. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यानंतर आता पुन्हा मोठी राजकीय रणनीती आखत आहेत. एकनाथ शिंदे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असलेले रवींद्र वायकर यांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उत्तर पश्चिम लोकसभेची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटली आहे. इथे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात आता उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी रवींद्र वायकर हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. या मतदारसंघात सध्या पूनम महाजन या खासदार आहेत. पूनम यांच्या ऐवजी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांचं नाव सर्व्हेत सर्वात पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेटीमध्ये चर्चा झाल्याचीदेखील माहिती मिळत आहे.

पूनम महाजनांचा पत्ता कट करुन उज्ज्वल निकम यांना उमेदवारी?

उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. त्यांनी 26/11 हल्ल्याची केस लढवली होती. त्यांनी कोर्टात युक्तिवाद केल्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या रुपाने मोठा चेहरा भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातील सध्याच्या खासदार पूनम महाजन या दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांना गेल्या निवडणुकीत लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. पण त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क कमी होत असल्याची चर्चा होती. त्यांनतर आता उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत येत आहे.

दक्षिण मुंबईत कुणाला उमेदवारी?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेले नेते मिलिंद देवरा यांचं नाव समोर येत आहे. या मतदारसंघासाठी आधी भाजप नेते तथा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत येत होतं. त्यानंतर आता मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत आलं आहे. मिलिंद देवरा यांच नाव सर्व्हेतून समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजप शिंदे गटासाठी ही जागा खरंच सोडणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.