मुंबई: गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या निवडणूक निकालावरून ठाकरे गटाने भाजपवर शरसंधान साधलं आहे. गुजरात तर मोदींचेच होते. गुजरातच्या विजयाचे श्रेय मोदींचेच आहे. पण दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात विजयी होणं ही खरी कसोटी होती. हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील पराभवावर भाजपचं कोणीच का बोलत नाही? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने हा सवाल केला आहे. आजचा गुजरात मी बनवला आहे. गुजरात माझे आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती जनतेला म्हटलं. मोदींनी गुजरातमध्ये विशेष लक्ष दिलं. त्यामुळे गुजराती जनतेने मोदींना भरभरून मतदान केलं. गुजरातच्या या ऐतिहासिक विजयाचे श्रेय मोदी यांनाच दिलं पाहिजे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
गुजरामध्ये माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम आजवर कायम होता. यावेळी 149चा आकडा पार करू असं भाजपचे प्रमुख नेते सांगत होते. त्यानुसार भाजपने हा आकडाही पार केला. भाजपच्या गणित तज्ज्ञांचे कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात आणि तसा आकडा निकालातून बाहेर येतो. हा मोठाच चमत्कार म्हणावा लागेल, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
गुजरातमधील विजयाची कारणमिमांसाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने राज्यातील मुख्यमंत्री बदलला. काही मंत्री बदलले. भूपेश पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली. गुजरातमध्ये जागतिक दर्जाचे सोहळे होत आहेत.
जागतिक नेते मोदींमुळेच साबरमती आणि अहमदाबादेत उतरतात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले. त्याचाही फायदा निवडणुकीत झाल्याचं विश्लेषण या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
आपने गुजरातमध्ये येऊन फक्त हवा केली. त्यातच आपने काँग्रेसची मते खाल्ली. मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला. मात्र, आप नसती तरी भाजपच विजयी झाली असती. फक्त काँग्रेसची स्थिती इतकी दयनीय झाली नसती, असंही नमूद करण्यात आलं आहे.
भाजपने गुजरात जिंकले. पण राजधानी दिल्ली आणि हिमाचल प्रदेश गमावले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकाच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभवही ऐतिहासिकच म्हणावा लागे, असा टोलाही लगावण्यात आला आहे.