मुंबई: आता चीनच्या सीमेवर जे घडले आहे, जे घडत आहे त्याचे काय? मोदीनॉमिक्सप्रमाणेच मोदी सरकारच्या यशस्वी परराष्ट्र धोरणाचे ढोल वाजवता ना, मग काश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग आणि गलवान-तवांगमधील चिनी घुसखोरीची जबाबदारीही घ्या. त्यासाठी आधीच्या सरकारकडे बोट दाखवून पळ काढू नका. तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल, अशा शब्दात दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला फटकारण्यात आलं आहे. सीमाभागात पायाभूत सुविधांचे जाळे तर 2014 नंतरच घट्ट विणले गेले, असे ‘दाखवायचे दात’ केंद्र सरकारची भक्त मंडळी येताजाता चमकवीत असते. मात्र अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर 9 डिसेंबरच्या रात्री जे घडले त्याने या दाखवायच्या दातांची ‘दातखीळ’ बसली आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहिले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, हिंदुस्थानची एक इंचही जमीन कोणाला गिळू देणार नाही, असे इशाऱ्यांचे ‘अग्निबाण’ सध्याचे सरकार नेहमीच बीजिंगच्या दिशेने सोडत असते. मात्र हे अग्निबाण फुसके आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यांचे नगारेही फुटके आहेत हे 9 डिसेंबर रोजी पुन्हा सिद्ध झाले, अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे.
काहीही झाले की आधीच्या राज्यकर्त्यांकडे बोट दाखवायचे. कश्मीरचा प्रश्न असो की चीनसोबतचा तंटा, पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्षाच्या नावाने खडे फोडायचे. आताही तेच सुरू आहे. प्रत्येक वेळी नेहरू-गांधी घराणे आणि काँग्रेसवर खापर फोडून काय होणार? दुसऱ्याकडे बोट दाखविल्याने स्वतःचे अपयश झाकले जाते असे समजण्याचे कारण नाही.
2014 पासून तर देशात तुमची एकहाती सत्ता आहे. सर्वच क्षेत्रांत हिंदुस्थानला महासत्ता बनविणारे ‘महाशक्ती’ सरकार असे स्वकौतुकाचे ढोल तुम्ही बडवीत असता. तरीही पाकिस्तान किंवा चीन यांच्या कुरापती का सुरू आहेत? दोन वर्षांपूर्वी गलवान येथील चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. आता तवांग येथील झटापटीत काही जवान जखमी झाले. त्यासाठीही आधीचेच राज्यकर्ते जबाबदार धरायचे का?
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अहमदाबादेत नदीकाठी झोपाळय़ावर झोके घेतले, तेथील आदरातिथ्याचा आनंद घेतला म्हणून चीनच्या हिंदुस्थानविरोधी विस्तारवादी धोरणात आणि शत्रुत्वात ‘जिलेबी’चा गोडवा आला असे झालेले नाही.
2021 च्या ऑक्टोबरमध्येही चिनी आणि हिंदुस्थानी सैन्यात चकमक झाली होती. त्या वेळी तर केंद्रात काँग्रेसचे सरकार नव्हते. मागील वर्षभरात पाकिस्तान आणि चीनमधून ड्रोनची घुसखोरीही वाढली आहे. मग या ‘उडत्या दहशतवादा’साठी कोणाला जबाबदार धरायचे?
चीनने डेपलांगमध्ये एलएसीच्या सीमेपासून काही किलोमीटर आत सुमारे 200 ठिकाणी तळ ठोकला आहे, पण सरकार त्याबाबत मौन बाळगून आहे, असा आरोप आता केला जात आहे. तो खरा असेल तर परिस्थिती खूपच गंभीर म्हणावी लागेल.
केंद्र सरकार सत्ताकारणाबाबत जेवढे गंभीर आहे तेवढे देशांतर्गत आणि देशाच्या सीमांवरील वाढत्या धोक्यांबाबत गंभीर नाही. म्हणूनच इकडे सरकार पक्ष गुजरातच्या विजयोत्सवात आत्ममग्न होता आणि तिकडे तवांगमध्ये आपले सैनिक चिन्यांची घुसखोरी मोडून काढण्यासाठी झटत होते.