मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या भाषणात बोलताना सर्वात आधी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक केलं. जालन्याच्या अंतरवली सराटे गावात मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाल्यानंतर आपण तिथे गेलो होतो. तिथे एका घरात थांबल्यावर आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक प्रसंग काय होता, या विषयी उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.
“मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जुन मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजदारपणे त्यांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे. त्यांनी आज चांगली गोष्ट केली आहे. धनगरांना साद घातली आहे. आताचं सरकार हे जनरल डायरवालं सरकार आहे. जालियनवाला बागसारखं सरकारने अंतरवली सराटी येथे पाशवी लाठीचार्ज केला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी तात्काळ तिथे गेलो होतो. कुणाची डोके फोडली आहेत. तर कुणाला छर्रा मारलेल्या आहेत. काही घटना अशा घडतात की हृदयामतध्ये घर करुन राहतात. मी संभाजीनगर येथून निघालो आणि जात होतो तेव्हा आम्ही एका घराजवळ थांबलो. मी बाथरुमला जायचं म्हणून गेलो. बाहेर आल्यानंतर तिथली माऊली आणि मुलगी हातामध्ये पंचारती घेऊन ओवाळायला उभी होती”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“मी त्यांना नमस्कार करुन सांगितलं की, ताई आज ओवाळू नका. भयानत घटना इथे घडली आहे. मग ताईने मला विचारलं की, मी राखी बांधू शकते का? हृदयस्पर्शी प्रसंग होतं. ती माऊली मला राखी बांधत असताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली, लाठीचार्जमध्ये मलासुद्धा खूप मारलं. मी कशीबशी निसटले. पण माझा मुलगा आणि सून यांना खूप मारहाण झाली. ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“माझ्यासमोर एक ताई बेडवर होती. तोंड पूर्ण सुजलं होतं. नाक फुटलं होतं. सोबत होते त्यांनी मला सागितलं की, साहेब यांचं डोकं सुद्धा फुटलं आहे. एवढ्या निर्घृणपणे तुम्ही वागता? मी मुख्यमंत्री होतोच, त्याहीवेळेला हा प्रश्न होताच. मराठा आंदोलन तेव्हाही सुरु होतं. पण इकडे आलेल्या एकाने सांगावं की, कुणावर तरी लाठीचार्जचा मी आदेश दिला होता का? पोलीस एवढे रानटी वागू शकतात का? जालन्याचा डायर कोण?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मी जरांगे पाटील यांना भेटलो. त्यांनी मला बंदुकीची गोळी दाखवली. म्हणाले, साहेब हे बघा एवढी मोठी गोळी आमच्यावर झाडली, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. काश्मीरमध्ये दंगेखोरांवर ज्या छर्याच्या बंदुका वापरतात त्या बंदुका वापरल्या. कुणाच्या डोक्यात तर कुणाच्या गालात छर्रा गेल्या. कुठे चाललोय आपण? गद्दारांना म्हणावं तुमच्यात हिंमत असेल तर प्रस्न सोडवून दाखवा. मराठा माणसाला न्याय द्या. मराठा समाजाला न्याय द्या.
हा विषय लोकसभेत सुटेल. आमचा आग्रह होता की, ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये जे अधिवेशन घेण्यात आला, संसदेत न्याय देणारा निर्णय मराठा, धनगर, ओबीसींसाठी घ्या. जातीला पोट असतं. पण पोटाला जात लावू नका. ते पोट कोणत्याही जातीचं असो ते भरलं गेलंच पाहिजे.