उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच गेल्या आठवड्यात अँजिओप्लास्टी सर्जरी झाली. पण विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आजारपणातून बाहेर पडत पुन्हा पक्षासोबत जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आज दीपक साळुंखे यांच्या पक्षप्रवेशावेळी माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दीपक साळुंखे यांची सांगोल्यात ताकद आहे. त्यामुळे त्यांना कदाचित सांगोल्यातून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसे संकेत उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
“दसऱ्यानंतर आज पहिल्यांदा मी तुमच्यामध्ये आलेलो आहे. मधल्या काळात हॉस्पिटलची एक वारी करावी लागली. डॉक्टर म्हणाले आराम करा. पण आता आराम करायचा तरी किती? आधी हरामांना घालवायचं आहे. त्यामुळे आता आराम नाही. पण आज कामाला सुरुवात केली. मुहूर्त चांगला लाभला आहे. आबासाहेब मजबूत गडी ते शिवसेना परिवारात सामील झाले आहेत. आबा तुमच्या हातात मशाल दिलेली आहे. त्याचा अर्थ ज्याने त्याने समजून घ्यावा. आता ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“एक लक्षात घ्या की, ही निवडणूक सोपी नाही. दीपक आबा आले म्हटल्यावर विजय नक्की हे मला माहिती आहे. मग मी असं म्हणतो की, विजयच होणार असेल तर मी सभेला आलोच नाही तर? म्हणजे आलो पाहिजे ना? मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आजपासून पूर्ण मतदारसंघात घराघरात आपली मशाल ही पोहोचवली पाहिजे. कारण हे जे गद्दार आहेत ते नुसते गद्दार नाहीत, ते धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम निर्माण करतात. म्हणूनच शिवसेनाप्रमुखांची निशाणी मशाल आहे ती आतापासून आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.
“तुम्ही दीपक आबा यांना उमेदवारी जाहीर करा म्हणतात, पण आपण अजून उमेदवारी कुणाला जाहीर केलेली नाही. मी फक्त एवढं सांगेन की, दीपक आबांच्या हाती मशाल दिलेली आहे. मशालीची धग ही तुम्हाला दाखवून द्यायची आहे. मी सभेला येईल तेव्हा विस्ताराने बोलेनच. तूर्तास मी तुमचं पक्षात स्वागत करतो. तुमच्याकडून म्हणजे माझा सांगोल्याचा आमदार जो निवडून आला होता तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचं आहे. मला खात्री आहे की, तुम्ही या शब्दाला जागाल आणि आपला आमदार निवडून आणाल. जिंकून आणल्यानंतर परत एकदा येईन. तोपर्यंत शुभेच्छा देतो”, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.