मुंबई | 29 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडीकडून सलग 9 तास चौकशी झाली. या चौकशीनंतर रवींद्र वायकर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजकीय दबावातून आपल्याविरोधात ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केला. “ते 9 तारखेला माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी ज्यावेळी सुप्रीमो अॅक्टिविटी सेंटर बांधलं, त्या अनुषंगाने 2002 पासूनचे आतापर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे सांगितलं आहे. आता तुम्ही सांगा 19 वर्षांचे कागदपत्रे तुम्ही ताबोडतोब देऊ शकता का? हा प्रश्न होता. त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ वाढवून मागत होतो. एकतर माझी तब्येत बरी नव्हती हा वेगळा विषय होता”, असं स्पष्टीकरण रवींद्र वायकर यांनी यावेळी दिलं.
“इनकम टॅक्सच्या नियमानुसार सात वर्षांचा तपशील द्यायला हवा. पण त्यांनी 19 वर्षांचा तपशील मागितला त्यामुळे वेळ लागणार होता. पण त्यांनी जो आज वेळ दिला होता त्यानुसार मी आलो. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून माझ्यावर बांधकामाची जी तक्रार केली होती, मी जे क्लब बांधलं होतं त्याला ओसी वगैरे सर्व होतं. जवळपास 19 वर्षे ते चाललं. तेव्हा कोणती तक्रार झाली नव्हती. ते तोडून नवीन डीसीआर आल्यानंतर त्याच्या माध्यमातून दोन वर्ष बांधकामाचं काम झालं. पण राजकीय दबावातून आणि आयुक्तांच्या माध्यमातून ते बांधकाम बंद करण्याची नोटीस दिली”, असं रवींद्र वायकर यांनी सांगितलं.
“आम्ही त्या नोटीसला कोर्टात चॅलेंज दिलं. आम्ही आता सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टात तारीख आहे. पण त्याअगोदर जी तक्रार झाली होती त्यामध्ये त्यांनी जो आरोप केला त्यामध्ये म्हटलंय की, तुम्ही कोट्यवधी कमवले. तक्रारदारांनी दावा केलाय की, आम्ही 500 कोटींचा घोटाळा केला. अरे 32 ते 36 कोटींचा गेल्या 19 वर्षात बिझनेस झाला. त्यावर 20 कोटी खर्च पगार देण्यात झाला. त्यामुळे 11 कोटी आले. यापैकी आम्हाला प्रत्येकी 1 कोटी 22 लाखाचा फायदा झाला. बाकीचे 5 कोटीचे फायदा झाला ते पंजाब-महाराष्ट्र बँकेत आहेत”, असा हिशोर वायकर यांनी सांगितला.
“आम्हाला महिन्याला किती फायदा झाला असेल? याउलट पुनर्बांधकामाला परवानगी मिळाली तेव्हा बेसमेंटमध्ये त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे. अशा पद्धतीने एखाद्या वास्तूला परवानगी दिल्यानंतर त्याचं बांधकाम झाल्यानंतर त्याचा जबाबदार कोण? हे मी त्यांना पटवून दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया वायकर यांनी दिली.
“ज्यांनी क्लब घेतले त्यामध्ये लग्न होत नाहीत का, ज्या शाळांमध्ये हॉल आहेत तिथे लग्न होत नाहीत का? मग त्या ठिकाणी वेगळा कायदा आणि रवींद्र वायकरला वेगळा कायदा. हे असं का होतंय? हे चुकीचं होतंय ना, कुणाच्या दबावाखाली तुम्ही हे करत आहात? हे चुकीचं आहे. कसा दबाव चाललाय ते मला माहिती आहे. पण मी कायद्याच्या कक्षात कोणतीही चूक केलेली नाही हेच त्यांना सांगितलं आहे. ते जेव्हा बोलवतील तेव्हा नक्कीच येणार. हे जे चाललेलं आहे राजकीय दबावातून चालू आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात निकाल लागेलच. मी कायद्याच्या दृष्टीने तपासयंत्रणांना सहकार्य करत राहणार आहे”, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली.