शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसान प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपवर नाव न घेता सडकून निशाणा साधला. “हा खटला जो चालला, किंवा मी जे काही सांगितलं ते मी जनतेच्या हितासाठी बोललो. या राज्यात कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचार संबंधी माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून, एका वृत्तपत्राचा संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल. माझ्यासारखे आजही काही लोकं आहेत, त्या मुलुंडच्या नागड्या पोपटलालसारखे नाही की, उटसुट कुणावरही घाणेरडे आणि खोटे आरोप करायचे. मग त्याच भ्रष्टाचाऱ्यांना परत सरकारमध्ये घेऊन बसायचं हे आमचे धंदे नाहीत”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
“आमच्यासमोर माहिती आली की, मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत शौचालय घोटाळा झालेला आहे, त्या संदर्भात मीरा भाईंदर महापालिकेच्या अहवालात एक ठपका ठेवलेला आहे. मीरा भाईंदर महापालिकेचे तेव्हाचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना पुराव्यासह पत्र लिहिलं आहे. त्यानंतर त्याभागाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण शौचालय घोटाळ्या संदर्भात पुरावे देवून त्याच्या चौकशीची मागणी केलेली आहे. तेव्हा तुमची बेआब्रू झाली नाही?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“तेव्हा या लोकांनी आमची मानहानी झाली हो, आम्हाला वेदना झाल्या हो, असं सांगत कोर्टात गेले नाहीत. या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालेली आहे. विधानसभेत या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आणि कारवाईचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच कुठेतरी धूर येतोय किंवा पाणी मुरतंय. त्या संदर्भात आम्ही वक्तव्य केलं तर मानहानी हा प्रकार कसाकाय असू शकतो? म्हणजे अशाप्रकारे आमचा हा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“मी न्यायालयाचा आदर राखून म्हणतोय, न्यायालयाने म्हटलंय की, याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या. वेदना कशा होऊ शकतात? त्यांचे पती जेव्हा खोटे आणि भंपक आरोप करतात, तेव्हा इतरांना वेदना होत नाहीत का? आमच्या मनाला वेदना होतात. इतके सर्व भ्रष्टाचारी, ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, त्यांचे कागद दाखवले, त्यांना अटक करण्यासाठी आंदोलने केली ते सर्व तुमच्या पक्षामध्ये बसलेले आहेत. तर आमच्या मनाला किती वेदना होत असतील?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा एका खटल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली. आता विधानसभेच्या निवडणुकीआधी मला शिक्षा ठोठावली. न्याय व्यवस्था ही कुणाची तरी रखेल झालेली आहे, असं मी म्हणत नाही तर अण्णा भाऊ साठे यांनी सांगून ठेवलेलं आहे. न्याय व्यवस्था ही दबावाखाली आहे. ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जातात, त्या देशात आमच्या सारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची?”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.