शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे उमेदवार अजय राय यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “100 टक्के मोदी आणि अमित शाह जास्त दिवस दिल्लीत राहणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले. “पुढच्या वेळी नरेंद्र मोदी वारणसीतून निवडणूक लढण्यासारखी परिस्थिती राहणार नाही. वाराणसीतून मोदी पुन्हा निवडणून येतील, असं वाटत नाही. एक योद्धा दुसऱ्या योद्ध्याला भेटण्यासाठी आलेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
“शिंदेंचे लोक आज फरार होतात. उद्या शिंदेही फरार होईल. एकनाथ शिंदेही एक दिवस फरार होईल. एक गुंडांची टोळी सरकार चालवत आहे. वरळीतल्या घटनेतील आरोपीचं मिहिर शाह असं त्यांचं नाव आहे. शाह हे त्यांचं आडनाव हे क्राईम करून पळणारी लोकं आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी मिहीर शाह याच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला.
वरळीत आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास प्रदीप नाखवा (वय ५० वर्षे) हे त्यांच्या पत्नी कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) यांच्यासोबत त्यांच्या स्कुटीवरुन डॉ. अॅनी बेझंट रोड वरुन वरळी कोळीवाड्याकडे जात होते. या दरम्यान लॅन्डमार्क जीप शोरूम समोर, डॉ. अॅनी बेझंट रोड, येथे मागून येणाऱ्या बीएमडब्लु कारने त्यांच्या स्कुटीला मागून जोराची धडक दिली. कारचालक धडक देवूनच थांबला नाही. तर त्याने नाखवा दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडल्यानंतर ब्रेक दाबला. यानंतर हे दाम्पत्य गाडी खाली पडलं. यानंतर कारचालकाने महिलेच्या अंगावर गाडी चढवली. त्यानंतर त्याने महिलेला दूरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवसेनेचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्याचं नाव मिहीर शाह असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर आरोपी मिहीर शाह हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संजय राऊत यांनी आरोपीच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला आहे.